आजारपणानंतरच्या संजय राऊत यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

संजय राऊत बरे झाल्यानंतर सक्रिय झाले, पत्रकार परिषदेत निवडणूक संस्कृतीवर टीका केली. मुख्यमंत्री फडणवीसांनी राऊतांच्या आरोग्याबद्दल आनंद व्यक्त केला, पण त्यांच्या राजकीय टीकेला महत्त्व दिले नाही.

आजारपणानंतरच्या संजय राऊत यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
devendra fadnavis sanjay raut
Updated on: Dec 01, 2025 | 11:17 AM

महाराष्ट्रात सध्या नगरपरिषद आणि नगरपालिकांची धामधूम सुरु आहे. त्यातच आता गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेत असलेले ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत हे पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. संजय राऊत यांनी बरं झाल्यानंतर पहिली पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढवला. राज्यातील निवडणूक संस्कृती उद्ध्वस्त झाली, अशा शब्दात संजय राऊतांनी जोरदार टीका केली. आता संजय राऊतांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत बरे झाले ही आनंदाची गोष्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या प्रचारसभेत व्यस्त आहेत. यावेळी त्यांना संजय राऊत बरे झाले आहेत. आज त्यांची पहिली पत्रकार परिषद आहे, असा सवाल करण्यात आला होता. त्यावर त्यांनी उत्तर दिले. संजय राऊत बरे झाले ही आनंदाची गोष्ट आहे. ते बरे झाले याबद्दल मला अतिशय आनंद आहे. ते त्यांचं काम करतात. आम्ही आमचं काम करतो. पण कोणीही आमचा शत्रू नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संजय राऊत दररोज काहीतरी बोलत असतात

संजय राऊत हे आमचे राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे कोणताही विरोधक हा आजारी पडला तरी चांगला झाला पाहिजे. त्याची तब्ब्येत ठीक झाली पाहिजे. ही आपली अपेक्षा असते आणि ती पूर्ण झाली हे चांगलं आहे. संजय राऊत हे दररोज काहीतरी बोलत असतात. त्याला मी कालही उत्तर दिले नाही. आजही दिलं नाही. कारण त्यांनी केलेली विधान मी उत्तर देण्याच्या लायकीचे समजत नाही, असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी लगावला.

देवेंद्र फडणवीस हे आमचे कधी काळी जवळचे मित्र

तर दुसरीकडे संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस हे आमचे कधी काळी जवळचे मित्र होते आणि आम्ही नाती जपतो. आम्ही एकत्र काम केले आहे. आजारपणात त्यांनी स्वत: फोन करुन चौकशी केली. त्यासोबतच सर्व प्रकारची मदतही केली. राजकारण वेगळं आहे. व्यक्तिगत नाती वेगळी आहेत. केंद्रातील जवळपास सर्वच मंत्र्‍यांनी फोन करत माझी चौकशी केली. राजकारणात किती शत्रू असले तरी ते व्यक्तिगत स्तरावर शत्रूत्व येता कामा नये. देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी यांनीही माझी चौकशी केली. मोदी वारंवार चौकशी करत असतात. राज ठाकरे, उद्धव ठाकरेही सतत चौकशी करत असतात, असे संजय राऊत म्हणाले.