मोठी बातमी! संजय राऊतांच्या प्रकृतीत अचानक गंभीर बिघाड, पंतप्रधान मोदींकडून लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा

Sanjay Raut Health : संजय राऊत यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार चालू आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या होत्या.

मोठी बातमी! संजय राऊतांच्या प्रकृतीत अचानक गंभीर बिघाड, पंतप्रधान मोदींकडून लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा
SANJAY RAUT
| Updated on: Oct 31, 2025 | 6:09 PM

Sanjay Raut Health Update : खासदार संजय राऊत हे ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते आहेत. पक्षाची भूमिका ते समर्थपणे मांडत असतात. कोणत्याही अडचणीच्या काळात संजय राऊत हे पक्षासाठी तसेच उद्धव ठाकरे यांच्यासाठी ढाल म्हणून उभे राहिलेले असतात. सध्या राऊत विरोधकाची भूमिका मोठ्या हिमतीने पार पाडत आहेत. मात्र सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांच्या प्रकृतीत गंभीर स्वरुपाचे बिघाड झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. या आजारावर मात करण्यासाठी त्यांना गर्दीत न जाण्याचा तसेच बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळेच पुढचे काही महिने त्यांना कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेता येणार नाही. खुद्द संजय राऊत यांनीच एक्स या समाजमाध्यमाद्वारे त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

राऊत यांनी नेमके काय सांगितले आहे?

संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. या पत्रात “आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले. पण शध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले आहे. माझ्यावर उपचार सुरू आहेत. मी यातून लवकरच बाहेर पडेन,” असे राऊत यांनी सांगितले आहे.

गर्दीत मिसळण्यावर राऊतांवर निर्बंध

तसेच, वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे आणि गर्दी मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे.

तसेच पुढे, मला खात्री आहे की मी ठणठणीत बरा होऊन नवीन वर्षात आपल्या भेटी येईन, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला आहे. राऊतांची प्रकृती बरी नसल्याचे समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली. नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सदिच्छांची दखल घेत राऊतांनीही त्यांचे आभार मानले आहेत.  माझे कुटुंबीय तुमचे आभारी आहेत, असे राऊत म्हणाले आहेत.

सुषमा अंधारे यांनीही केली उदंड आयुष्यासाठी प्रार्थना

राऊतांच्या प्रकृतीबाबत समजताच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना केली आहे. लवकर बरे व्हा.. आम्हाला कल्पना आहे की सार्वजनिक रित्या जरी आपण मिसळू शकणार नसलात तरी सुद्धा इथल्या पाताळयंत्री अजस्त्र महाकाय शक्ती विरोधात जी लढाई आपण उभी केलेली आहे ; त्या लढाईला वैचारिक रसद या दोन महिन्यात सुद्धा आपण पुरवत राहणार आहात, अशा भावना अंधारे यांनी व्यक्त केल्या.

आपण ठणठणीत बरे होणार आहात- अंधारे

सन्माननीय पक्षप्रमुखांवर चौफेर हल्ले होत असताना छातीचा कोट करून आपण हा शिवसेनेचा गड वाचवण्यासाठी उभे राहिलात… खऱ्या अर्थाने मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा म्हणजे नेमकं काय हे आपल्याकडे बघितल्यावर महाराष्ट्राला कळतं. आपण ठणठणीत बरे होणार आहात. आपल्यासोबत फक्त महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचेच नाही तर इथला प्रत्येक दबलेला पिचलेला आणि भाजपच्या दंडेलशाहीने मेटाकुटीस आलेला प्रत्येक माणूस आपल्यासारख्या लढाऊ शिलेदारासाठी ठामपणे उभा आहे. या सगळ्यांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत, असा विश्वासही अंधारे यांनी व्यक्त केला. संजय राऊत यांच्यावर नेमके कोणत्या आजारावर उपचार होत आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही