पूजा किया, बली भी चढाया..; सत्तांतरावेळी शिंदेंनी गुवाहाटीत काय केलं? संजय राऊतांनी उलगडलं रहस्य

महाराष्ट्रातील सत्तांतराच्या वेळी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या इतर आमदारांनी तिथे काय केलं याचं रहस्य खासदार संजय राऊत यांनी उलगडलं आहे. गुवाहाटीच्या दौऱ्यादरम्यान तिथल्या पुजाऱ्यांनी सत्य सांगितल्याचं त्यांनी लेखात म्हटलंय.

पूजा किया, बली भी चढाया..; सत्तांतरावेळी शिंदेंनी गुवाहाटीत काय केलं? संजय राऊतांनी उलगडलं रहस्य
Eknath Shinde and Sanjay Raut
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 01, 2025 | 11:29 AM

सत्तांतरावेळी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी गुवाहाटीत नेमकं काय केलं, यामागचं रहस्य खासदार संजय राऊत यांनी मुखपत्र ‘सामना’तील रोखठोक सदरात उलगडलं आहे. शंखनाद ते रेड्याची शिंगे या मथळ्याखाली रोखठोक प्रकाशित करण्यात आलं आहे. राऊतांना गुवाहाटी दौऱ्यात तिथल्या पुजाऱ्यांनी काय सांगितलं, यासंदर्भातील माहितीसुद्धा त्यांनी या सदरात सांगितली आहे. ‘शिंदे आणि त्यांच्याबरोबर शिवसेनेतून फुटलेल्यांच्या कर्मभूमीत म्हणजे गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात 15 दिवसांपूर्वी होतो. राज्याच्या मागच्या पक्षांतराच्या वेळी हे मंदिर आणि रेडाबळी प्रसिद्ध पावलं होतं. त्याची आठवण गाभाऱ्यातील पांडा म्हणजेच पुजारी लोकांनी माझ्याकडे काढली’, असं त्यांनी लिहिलंय.

संजय राऊतांच्या लेखात काय?

‘आम्ही तुम्हाला ओळखतो. आप महाराष्ट्र के पॉलिटिशयन है’, असं ते मला म्हणाले. साडेतीन वर्षांपूर्वी या गाभाऱ्यात आणि मंदिराच्या परिसरात नेमकं काय घडलं हे पांडांनी स्वत:च सांगायला सुरुवात केली.

पांडा- वो शिवसेना के लोगो ने यहां आकर बहोत विधी पूजा किया. पांडा लोगों को भारी दक्षिणा भी दिया
राऊत- कितने लोग थे?
पांडा- वो एकसाथ पचास-साठ लोग आए थे
राऊत- कौनसा पूजा किया?
पांडा- यहां जो होता है सब पूजा किया. बली भी चढाया देवी को
राऊत- कौनसा बली दिया
पांडा- भैसा को काटा. कुछ लोगोंने बदक को भी काटा. शत्रूपर विजय प्राप्त करने के लिए सभी ने बली चढाया

पांडा म्हणाला, बहुतेक सगळ्यांनीच रेड्याचे आणि इतर प्राण्यांचे बळी चढवले. त्यातील 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंगे कापून सोबत नेली. या शिंगांना ‘सिंदूर’ लावून ती मंतरली जातात आणि ईस्पित स्थळी खोल पुरून मनोकामनेची पूजा केली जाते. त्यासाठी याच मंदिरातील पांडांना बोलावलं जातं. मुंबई-महाराष्ट्रात ही शिंदे आणली गेली. ती सर्व मंतरलेली शिंगे कोणी कुठे पुरली ते रहस्यच आहे. शिंदे यांच्या काळात ही शिंगे ‘वर्षा’ बंगल्याच्या मागच्या बाजूला पुरली असं मी लिहिलं तेव्हा खळबळ उडाली. मुख्यमंत्री फडणवीस ‘वर्षा’ बंगल्यावर पुरलेल्या शिंगांच्या भीतीपोटी राहायला जात नाहीत ही माहिती पक्की होती. आज फडणवीस ‘वर्षा’वर गेले आणि त्यााआधी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ‘वर्षा’ परिसरातील मोकळ्या जमिनीचं स्पानिंग करून घेतलं. या शोध मोहिमेत तिथं पुरलेल्या रेड्यांची शिंगे मिळाली काय? हा पहिला प्रश्न आणि फडणवीस यांचं संपूर्ण समाधान झालं काय? हा दुसरा प्रश्न’, असं त्यांनी लेखात लिहिलंय.

“मी जेव्हा गुवाहाटीला गेलो, तेव्हा योगायोगाने अमावस्या होती. मंदिरात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील आणि ठाण्यातील भाविक आले होते. एकनाथ शिंदे सर्व आमदारांना घेऊन तिथे गेले होते, त्यानंतर कामाख्या मंदिरात भक्तांची गर्दी वाढली. त्याठिकाणी अनेक प्राण्यांचे बळी दिलेले होते, त्यांची शिंगे तिथे होती. हे पाहून दुर्दैव वाटलं. दोन-तीन वर्षांपूर्वी शिवसेनेच्या काही लोकांनीही तिथे मोठ्या प्रमाणात प्राण्यांचे बळी चढवले होते. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी हे बळी चढवले गेले. महाराष्ट्रातल्या सत्तांतरासाठी हे केलं गेलं. आम्ही गाडगेबाबांचे भक्त आहोत” असं राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.