नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते, पंतप्रधान मोदींनी देशातील… संजय राऊतांचा गंभीर आरोप

नीट पेपरफुटी प्रकरणावरून संजय राऊतांनी भाजपवर तीव्र हल्लाबोल केला असून, या संपूर्ण गैरव्यवहाराला आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना भाजपचे नेतेच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते, पंतप्रधान मोदींनी देशातील... संजय राऊतांचा गंभीर आरोप
sanjay raut
| Updated on: May 18, 2026 | 11:06 AM

देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET-UG २०२६ परीक्षा पेपरफुटीमुळे वादात सापडली आहे. यामुळे नीट परीक्षा रद्द करण्यात आली होती. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारसह न्यायव्यवस्थेवर अत्यंत तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली. नीट पेपर फुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी नुकतंच मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरुन केंद्र आणि राज्य सरकारसह न्यायव्यवस्थेवर अत्यंत तिखट शब्दात टीका केली. नीट (NEET) पेपर फुटी प्रकरणापासून ते व्हीआयपी सुरक्षा आणि न्यायधीशांच्या भूमिकेपर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाजपला धारेवर धरले. नीट पेपर फुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते आहेत. सध्याचे राज्यकर्ते कोण आहेत? या संपूर्ण गैरव्यवहाराला आणि त्यामुळे झालेल्या तीन विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना भाजपचे लोकच जबाबदार आहेत,” असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

देवेंद्र फडणवीस आणि व्हीआयपी ताफ्यावरून टोला

देवेंद्र फडणवीस हे जेव्हा विधानभवनात बाईकवरून जात होते, तेव्हा पूर्ण रस्ता अडवण्यात आला होता. भाजपच्या नेत्यांनी या ढोंगी प्रवृत्तीतून आता बाहेर पडायला हवे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले, “अमित शहा यांनी त्यांचा ताफा कमी केला का? दिल्लीतले तीन रस्ते केवळ त्यांच्या सुरक्षेसाठी बंद असतात. मग तुम्ही कसल्या ताफे काढण्याच्या गोष्टी करताय? असेही संजय राऊतांनी विचारले.

पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका

“देश संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे आहेत? ते युरोपमधील ७ देशांच्या दौऱ्यावर आहेत. निवडणूक संपल्यावर देश संकटात आहे हे समजले का? मोदी दोन गाड्या घेऊन दिल्लीत फिरत होते. तुम्ही काय पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी आहात का? मोदींनी देशातील परिस्थितीवर चिंता कुठे व्यक्त केली? तर नेदरलँडमध्ये! आपल्या देशातील संस्कृती किती लोप पावत चालली आहे, याचे भान त्यांनी ठेवावे. ट्रम्प-निर्भर नव्हे, तर भारत खऱ्या अर्थाने मुक्त झाला पाहिजे,” असे संजय राऊत म्हणाले.

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे पक्ष अस्तित्वातच नाहीत, ते केवळ गट आहेत. मूळ पक्ष हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचाच आहे, कारण कोणत्याही पक्षाला स्वतःची भूमिका आणि विचारधारा असते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि मुंडे यांनीच अजित पवारांचे डोके फिरवण्याचे काम केले. तटकरे आणि पटेल यांना त्यांच्या कर्माची फळे नक्कीच मिळतील, असेही संजय राऊतांनी म्हटले.

Follow Us