
नुकत्याच झालेल्या आशिया चषक 2025 मध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यावरुन सध्या राज्यात मोठे घमासान सुरु आहे. यावरुन विरोधक हे भाजप सरकारवर टीका करत आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’ वृत्तपत्रातील अग्रलेखातून भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यात मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. हा सामना म्हणजे दहशतवाद्यांना आर्थिक मदत आहे, असा टोला लगावण्यात आला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रेलखातून भारत पाक सामन्याप्रकरणी सरकारवर ताशेरे ओढण्यात आले. “निर्लज्जपणाचा कळस गाठून दुबईत भारत-पाकिस्तान सामना खेळवण्यात आला. महाराष्ट्रासह भारतात या सामन्यावर तसा बहिष्कारच होता. मात्र भाजप आणि त्यांच्या हस्तकांनी दारे-खिडक्या बंद करून हा सामना पाहिला. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळ आणि क्रिकेटपटूंना तो मान्य करावा लागणार आहे, असे सुनील गावसकर यांनी जे सांगितले. त्यामुळे मोदी सरकारचा मुखवटा फाटला आहे”, असा घणाघात संजय राऊतांनी केला.
या अग्रलेखात संजय राऊत यांनी बीसीसीआय अध्यक्ष जय शहा यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “अमित शहांनी आपला पुत्र जय शहा यांना बीसीसीआय अध्यक्षपदी कोणत्या गुणवत्तेच्या आधारावर नेमले? क्रिकेटमध्ये जुगाराचा, सट्टेबाजीचा पैसा आहे. त्यामुळे निव्वळ व्यापार करण्यासाठीच जय शहा यांना क्रिकेटच्या व्यापारात आणले. राष्ट्रभक्तीशी याचा संबंध नाही. या सामन्यामुळे भाजपच्या देशभक्तीचे सोंग उघडे नव्हे, तर नागडे पडले आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली.
यावेळी संजय राऊत यांनी भाजपच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “एका बाजूला पाकिस्तानी कलाकाराला चित्रपटात प्रवेश दिला जात नाही, पण दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट संघाबरोबर सामना खेळला जातो. भाजपची ही भूमिका दुतोंड्या गांडुळासारखी आहे. यावेळी संजय राऊतांनी अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाचे उदाहरण देत म्हटले की, “जेव्हा आपल्या देशाचा अपमान होतो, तेव्हा ती टीम मैदानातून बाहेर पडते, पण आपण मात्र पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतो.” असा टोला लगावला.
त्यासोबतच संजय राऊत यांनी या सामन्यातील भारताच्या विजयाला ‘फिक्सिंग’ म्हटले आहे. 26 निरपराध भारतीयांची हत्या करणाऱ्या पाकिस्तानी टीमबरोबर ते क्रिकेट खेळले. हा सामना भारतीय टीम जिंकली असे म्हणतात. क्रिकेट सामन्यातील हा फिक्सिंग विजय सैन्याला अर्पण करण्याचा थिल्लरपणा भारतीय कप्तान सूर्यकुमार यादवने केला. हा भारतीय सैन्याचा आणि पुलवामा, पहलगाममधील शहीदांचा अपमान आहे, असे संजय राऊत म्हणाले. हा सामना म्हणजे केवळ पैशांचा खेळ आहे. दुबईतील या सामन्यातून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हजारो कोटी रुपये कमावले. या पैशांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होऊ शकतो. या सामन्यावर झालेली सट्टेबाजी आणि त्यातून मिळणारे पैसे हे पाकिस्तानातील दहशतवाद्यांना मजबूत करण्यासाठी वापरले जातात, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.