
“महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही अमित शाह यांनी त्यांची स्वत:ची निवडणूक प्रत्यक्ष मोदींची निवडणूक आहे अशा पद्धीतीने लढले. वाराणसीत सुरुवातीचे दोन तास मोदी पिछाडीवर होते. त्यानंतर मत मोजणी थांबवण्यात आली. मतमोजणी केंद्राची लाइट घालवण्यात आली. त्याचा परिणाम EVM मशीनवर झाला. डाटा उडाला, नवीन मशीन्स आणले. दिल्लीतून यंत्रणा हलली. मोदींचा पराभव वाराणसीत झाला होता. दोनतास या लोकांनी गोंधळ घातला. मतमोजणी हायजॅक केली. तोच प्रकार महाराष्ट्रात झाला” असा सनसनाटी आरोप संजय राऊत यांनी आज केला. महाराष्ट्राची निवडणूक फिक्स होती या राहुल गांधींच्या आरोपावर ते बोलत होते. “महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही, चोरला, हायजॅक केला. निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले. ईव्हीएम मशीनची समस्या आहे. शेवटच्या दोन तासात 60 ते 65 लाख मतदान अचानक वाढवलं गेलं. हे सेटिंग त्या पद्धतीने झालं” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
“राहुल गांधींनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर नेला. हिंदुस्थानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे हे जगाला कळलं. नरेंद्र मोदी, आपल्या सरकारला अनेक ठिकाणी अपमान सहन करावा लागतोय. त्याचं हे कारण आहे. हे लोक लोकशाही मानत नाहीत. हे हुकूमशाही प्रवृत्तीने काम करतात. निष्पक्ष पद्धतीने निवडणूक करत नाहीत, हे जगाला कळलं, देशाची बदनामी झाली. नरेंद्र मोदी असेल, आपला देश याची प्रतिष्ठा धुळीस मिळाली” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
तुमच्या मनात शंका का असावी?
ठाकरे गट आणि मनसेच्या युतीबद्दल संजय राऊत बोलले. “उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या मूळ शिवसेनेचे ते सर्वेसर्वा आहेत. तुमच्या प्रश्नाला त्यांनी काल उत्तर दिले. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे, ते होईल. मी संदेश नाही, बातमी देईन स्पष्ट उत्तर दिल्यावर तुमच्या मनात शंका का असावी?” असा संजय राऊत यांनी उलटा सवाल केला. “महाराष्ट्र म्हणजे मराठी माणूस, भाजप नाही तो उपऱ्यांचा, शेठजींचा पक्ष आहे. आम्ही 106 हुतात्म्यांच्या बलिदानाशी बांधिलकी ठेऊन काम करणारे आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचे चेले आहोत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्यावेळी महाराष्ट्राच्या हितासाठी अनेक पक्ष आपल्या विचारधारा बाजूला ठेऊन एकत्र आले, तेव्हा मराठी माणसाचा विजय झाला. मला वाटतं भाजपाने महाराष्ट्रात तसं वातावरण निर्माण केलय. मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसासाठी आवाज उठवणारे सगळ्यांना एकत्र यावं लागेल” असं संजय राऊत म्हणाले.
आम्ही मागे वळून पाहत नाही
मनसेचे काही नेते अजूनही काही गोष्टी म्हणतायत, त्यावर संजय राऊत म्हणाले की, “कोण काय म्हणतय, मागच्या गोष्टी खाजवत बसलेत त्यात मला इंटरेस्ट नाही. ज्याला सकारात्मक पाऊल टाकायचय, तो मागे वळून पाहत नाही. आम्ही मागे वळून पाहत नाही. आम्ही भविष्याकडे पाहतोय. 2014 साली काय झालं? 1857 च्या बंडात तुमचा विचार असा होता, किती मागे जाणार आहोत. आमची भूमिका स्पष्ट आहे, भविष्याकडे पहा. आज या महाराष्ट्राचा उज्वल भूतकाळ असताना वर्तमान आणि भविष्य खतम करण्याच काम चालू आहे”असा आरोप संजय राऊत यांनी केला.