Satara News: हे गाव लय भारी! अख्ख्या गावाला दिला दिवाळीचा बोनस; साताऱ्यातील ग्रामपंचायतीची राज्यात चर्चा
मान्याचीवाडी ग्रामपंचायत म्हणजे ग्रामविकासाचे अभ्यासकेंद्र म्हणून ओळखले जाते. ग्रामपंचायतीने राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत आहे.

सध्या देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा केला जात आहे. दिवाळी म्हटलं की प्रत्येक नोकरदाराला वेध लागतात ते बोनसचे. खासगी असो किंवा सरकारी प्रत्येक कर्मचाऱ्याला दिवाळीचा बोनस हा ठरलेला असतो. मात्र सातारा जिल्ह्यातील एका गावच्या ग्रामपंचायतीने चक्क अख्ख्या गावालाच दिवाळीचा बोनस वाटला आहे ज्याची राज्यभरात चर्चा होताना दिसत आहे.
अख्ख्या गावाला दिला दिवाळीचा बोनस!
याबाबत सविस्तर माहिती अशी की,सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गाव. लोकसंख्या अवघी 420 अन् 98 कुटुंबे. या ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना दिवाळी बोनस देऊन ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंदाचा गोडवा आणला आहे. या ग्रामपंचायतीने 2024 मध्ये स्वतःची एक योजना आखली.त्यामाध्यमातून ठराविक रक्कम उभी केली. आता त्या रक्कमेतून दरवर्षी जादाची रक्कम मिळते. त्या रकमेतून घरपट्टी पाणीपट्टी इतर कर आणि उर्वरित रक्कम संबंधित खातेदारांना रोख स्वरूपात दिवाळी बोनस म्हणून देण्यात आली आहे.
पाटण तालुक्यातील ही मान्याचीवाडी ग्रामपंचायत म्हणजे ग्रामविकासाचे अभ्यासकेंद्र म्हणून ओळखले जाते. ग्रामपंचायतीने राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत आहे. या छोट्याशा गावाने लोकसहभागातून आणि एकजुटीच्या जोरावर ग्रामविकास काय असतो हे दाखवून दिलं आहे. गावच्या लोकप्रतिनिधींची दूरदृष्टी अन् सर्वांच्या सहभागामुळे हे छोटेसे गाव राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहे.
मान्याचीवाडीची देशपातळीवरही चर्चा!
2024 मध्ये देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोत्तम पंचायतचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. या राष्ट्रीय पुरस्कारासोबत गावाला तब्बल 1, 50,00,000 म्हणजेच दीड कोटीचे पारितोषिक मिळाले. सोबतच अपारंपारिक आणि हरित ऊर्जेचा प्रभावी वापर केल्याबद्दलही मान्याची वाडी गावाला 1 कोटी रुपये रकमेचा ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार देऊनही गौरवण्यात आले होते. आता या आदर्श ग्रामपंचायतीने थेट अख्ख्या गावाला दिवाळी बोनस वाटल्याने पुन्हा एकदा त्याची जोरदार चर्चा होत आहे.