Vivek Oberoi : माझा छळ झाला, खूप त्रास…अंडरवर्ल्डकडून मिळायच्या धमक्या, विवेक ओबेरॉयनं सांगितला कठीण काळ
Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयनं एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील कठीण काळ सांगितला आहे.

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयनं आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मोठं यश आणि लोकप्रियता मिळवली. त्याला बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक मानलं जात होतं. मात्र, एका वादामुळे त्याचं नशीब पालटलं. आता या अभिनेत्यानं कोणाचंही नाव न घेता त्या वादावर भाष्य केलं आहे. अभिनेत्यानं खुलासा केला आहे की, त्याचा छळ झाला होता आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांना अंडरवर्ल्डकडून धमक्यांचे फोन येत होते.
‘रिलर्न’ पॉडकास्टवर विवेक ओबेरॉयनं आपल्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्याबद्दल उघडपणे सांगितलं. त्यानं खुलासा केला की, बॉलिवूडने त्याला बाजूला सारलं होतं आणि कामापासूनही वंचित ठेवलं होतं. अभिनेता म्हणाला, ‘तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्पा होता. मी एका योग्य गोष्टीसाठी उभा राहिलो. माझा विश्वास होता की, मर्यादा ओलांडल्या जाऊ नयेत.’
‘महिलांना आदरानं आणि विशेष वागणूक दिली पाहिजे. मी चुकीच्या गोष्टींविरुद्ध उभा राहिलो, पण नंतर माझा छळ झाला. एका शक्तिशाली लॉबीनं सर्व गोष्टींवर नियंत्रण मिळवलं. ज्या चित्रपटांमध्ये मी काम करणार होतो, त्या चित्रपटांमधून लोकांनी आपला पाठिंबा काढून घेतला. जे लोक पूर्वी माझ्या संपर्कात होते, ते नंतर माझ्यापासून दूर गेले आणि मला फोन करून सांगू लागले की त्यांना अंडरवर्ल्डमधून फोन आले होते. त्यांना सांगण्यात आलं होतं की, जर त्यांनी या व्यक्तीसोबत काम केलं, तर ते उद्ध्वस्त होतील. मी खरोखरच खूप त्रास सहन केला. मी खूप कठीण काळाला सामोरे गेलो. काम न मिळण्याचा मुद्दा माझ्या प्रतिभेशी संबंधित नव्हता, ती एक अशी गोष्ट होती ज्यावर माझं नियंत्रण नव्हतं.’ असं विवेक म्हणाला.
दरम्यान, ‘कंपनी’, ‘साथिया’, ‘क्रिश ३’, ‘विवेकम्’ आणि ‘ल्युसिफर’ यांसारख्या चित्रपटांमुळे विवेक ओबेरॉयला ओळख मिळाली. सध्या तो रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या ‘रामायण’ या चित्रपटात दिसत आहे. यामध्ये, अभिनेता शूर्पणखेचा पती, विद्युतजिह्वा याची भूमिका साकारत आहे.
