
राज्यात गेल्या 2-3 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज मुंबईसह राज्याच्या विविध भागात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळला. मुसळधार पावसामुळे राज्यातील विविध भागात आज शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर आता उद्याही राज्याच्या विविध भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये उद्यासाठी पावसाचा रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे उद्याही बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक भागात उद्याही शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात 20 आणि 21 ऑगस्ट रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने 6 तालुक्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे. पुढील दोन दिवस पाटण, जावळी, वाई, महाबळेश्वर, कराड, सातारा या तालुक्यांतील सर्व शाळांना सुट्टी जाही करण्यात आली आहे.
कोकणातील रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. उद्याही रायगडला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्यामुळे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. याच कारणामुळे रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगर पालिका हद्दीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये, आश्रम शाळा, व्यवसाय आणि प्रशिक्षण केंद्रांना उद्या (20 ऑगस्ट) सु्ट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यात उद्याही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उद्याही शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांनाही अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे शिक्षण अधिकारी यांनी परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे.
Thane School Close
लोणावळ्यातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी शहरातील सर्व शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. तसेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यातील नद्यांची वाढती पाणी पातळी आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळांना 2 दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यासह महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळांना 20 व 21 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता नागरिकांना स्थलांतर झाल्यानंतर राहण्यासाठी शाळांची जागा, शाळा खोल्या उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी ही सुट्टी जाहीर केली आहे.