जवान जीवानिशी गेला, शहापूरचे बे अक्कल पोलिस म्हणतात खड्डा दिसला नाही का?

विकास गोरे यांच्या कुटुबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासही टाळाटाळ केल्याचाही आरोप केला आहे.

जवान जीवानिशी गेला, शहापूरचे बे अक्कल पोलिस म्हणतात खड्डा दिसला नाही का?
| Edited By: | Updated on: Aug 04, 2026 | 1:13 PM

मुंबई ते नाशिक महामार्गावरील भलेमोठे खड्डे प्रवासादरम्यान जीवघेणे ठरू लागले आहे. कालच शहापूरच्या नदी पुलावरील खड्ड्यामुळे अपघात झाल्याने टीडीआरएफ जवान विकास गोरे यांचा मृत्यू झाला आहे. मुंबई ते नाशिक महामार्गाची अक्षरश: चाळण झाल्यानंतरही प्रशासनचं अजिबात लक्ष नसल्याचे दिसत आहे. विकास गोरे यांच्या जाण्याने एका हसत्या-खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गोरे यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. पोलिसांनी ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी कुटुंबाला सुनावल्याचा आरोप करण्यात आला आहे. तुमच्या मुलालाच खड्डा दिसला नाही का? असे पोलिसांनी सांगितल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.

मृत जवानावरच गुन्हा दाखल करण्याची पोलिसांची भाषा, कुटुंबाचा आरोप 

शहापुरातील एका खड्ड्याने एका घराचा आधार हिरावला आहे. विकास गोरे यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचा आक्रोश केला जात आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यात बुलेट आदळल्याने ठाणे अग्निशामक दलातील टीडीआरएफ जवान विकास गोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघातानंतर संबंधित ठेकेदारांवर कारवाईची मागणी करण्यासाठी कुटुंबीयांची शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. परंतु तुमच्या मुलालाच खड्डा दिसला नाही का?” असा उलट सवाल पोलिसांनी केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. तक्रार नोंदविण्याऐवजी मृत जवानावरच गुन्हा दाखल करण्याची भाषा केल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे.

कुटुंबाकडून आर्थिक मदतीची मागणी  

विकास गोरे यांच्या पत्नीने हंबरडा फोडला. “देशासाठी धावणारा माझा पती गेला. आता दोन जुळ्या मुलींचे संगोपन कसे करायचे?” असा सवाल गोरे यांच्या पत्नीने केला. प्रशासनाने मुलींना आर्थिक मदत करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी पत्नीने मागणी केली. दिवंगत विकास गोरे यांच्या आईने म्हटलं की, ‘रस्त्यावरती अपघात घडला तरी माझा मुलगा त्यांना मदत करायचा. मात्र माझ्या मुलाला कोणीच थांबून मदत केली नाही. आमच्या घराचा आधारच निघून गेला. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी विकासने उचलली होती. मोठा भाऊ खाजगी कंपनीत काम करत असला तरी घराचा मुख्य आधार विकासच होता, असे कुटुंबीयांनी सांगितले.

विकासचे काका म्हणाले, ठेकेदारांवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून गेलो होतो. मात्र पोलिसांनी उलट आम्हालाच सुनावले’. तर विकासच्या भावाने आरोप करताना म्हटलं की, ‘इशादवाडी ,”बदलापूर पूर, भिवंडीसारख्या मोठ्या आपत्तीमध्ये जीव धोक्यात घालणारा माझा भाऊ आज खड्ड्याचा बळी ठरला. विकास म्हणतात मात्र विकासाचाच बळी खड्ड्यामुळे या लोकांनी घेतला. पोलीस हे जवानाच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे न राहता ठेकेदारांना वाचवत आहेत, असा संतप्त आरोप नातेवाईकांनी केलाय.

कारवाई कधी करणार? 25 तासांनंतरही गुन्ह्यांची नोंद नाही 

मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यात बुलेट आदळून टीडीआरएफ जवान विकास गोरे यांचा मृत्यू होऊन २५ तास उलटले, तरी ठेकेदार वा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल नाही. घटनास्थळी सीसीटीव्ही किंवा प्रत्यक्षदर्शी नसल्याने फक्त आकस्मक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहापूर पोलिसांकडून केवळ एडीआर नोंद करण्यात आली आहे. सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने चौकशी सुरू असल्याची माहिती हाती आली आहे.

तक्रार देण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी “खड्डा दिसला नाही का?” असे सांगत जबाबदारी मृत जवानावर ढकलण्याचा प्रयत्न केला, असा आरोप नातेवाईकांनी केला. परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आरोप फेटाळले आहेत. तर डीवायएसपींनी यासंदर्भात सीसीटीव्ही किंवा संबंधित कोणी प्रत्यक्षदर्शी आढळल्यास चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याचे सांगितले. आपत्तीमध्ये इतरांचे जीव वाचवणारा जवान खड्ड्याचा बळी ठरल्यानंतरही कारवाई होत नसल्याने कुटुंबीय आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us