साईबाबांनी दिलेली ती नऊ नाणी नेमकी कोणाकडे? शिर्डीत वातावरण तापलं, साईभक्त आक्रमक

साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेली नऊ नाणी नेमकी कोणाकडे आहेत? हा वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता आहे. शिर्डीमध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे.

साईबाबांनी दिलेली ती नऊ नाणी नेमकी कोणाकडे? शिर्डीत वातावरण तापलं, साईभक्त आक्रमक
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 30, 2025 | 4:59 PM

साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेली नऊ नाणी नेमकी कोणाकडे आहेत? हा वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता आहे. अरुण गायकवाड यांच्या बाजूने धर्मादाय आयुक्तांनी निकाल दिलाय, मात्र पत्रकार परिषदेत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे अरुण गायकवाड यांच्या विरोधात शिर्डीचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत, सकाळपासून निषेध आंदोलन करत ग्रामंस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसेच घरावर आणि गायकवाड यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र पोलिसांनी  ग्रामस्थांना वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे, सध्या शिर्डीत तणावाचे वातावरण दिसून येत आहे.

धर्मादाय आयुक्तांच्या चौकशी अहवालात देणगीचा तपशील आणि विनीयोग तसेच नऊ नाणे हे अरुण गायकवाड अध्यक्ष असलेल्या ट्रस्टकडे असल्याचं म्हटलं आहे. मात्र त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अरुण गायकवाड यांनी आपल्याकडची नाणी खरी असल्याचा दावा करत, शिंदे कुटूंबाकडे असलेली नाणी खोटी असल्याचं म्हटलं आहे, यावेळी बोलताना त्यांनी साईबाबांचा डीएनए करा म्हणजे खरं खोटं समोर येईल, असं वादग्रस्त वक्तव केल्यानं वाद निर्माण झाला होता, त्यानंतर चूक लक्षात आल्यानंतर अरुण गायकवाड यांनी जाहीर माफी देखील मागितली आहे.

मात्र  या वक्तव्या विरोधात ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले असून, अरुण गायकवाड यांचा निषेध केला जात आहे. आंदोलकांनी घोषणाबाजी करत अरुण गायकवाड यांचे घर आणि दुकान तोडण्याचा निर्धार करत मोर्चा काढला, मात्र पोलीसांनी हस्तक्षेप करत कायदा हातात घेऊ नये अशी विनंती ग्रामस्थांना केली, यावेळी आंदोलकांनी अरुण गायकवाड यांच्या फोटोला पायाखाली तुडवत आणि शाई ओतत निषेध केला, त्यानंतर अरुण गायकवाड यांनी साई भक्तांची माफी देखील मागितली आहे.

अरुण गायकवाड यांनी माफी जरी मागितली असली तरी हा वाद आता शमण्याची चिन्हे दिसत नाहियेत. जर साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेना नऊ नाणी दिली होती, तर आज शिंदे कुटूंबाच्या घरी नऊ, गायकवाड कुटूंबाकडे नऊ आणि आणखी एका कुटुंबाकडे चार असे बावीस नाणे झाले कसे? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.