देवाच्या दारातच भाविकाची लूट; शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी गेलेल्या नागरिकासोबत घडला धक्कादायक प्रकार

शिर्डीत साईबाबा दर्शनासाठी आलेल्या एका परदेशी नागरिकाची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

देवाच्या दारातच भाविकाची लूट; शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी गेलेल्या नागरिकासोबत घडला धक्कादायक प्रकार
shirdi sai baba
| Updated on: Feb 17, 2025 | 4:46 PM

शिर्डी श्री साईबाबा संस्थान हे गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांना लुटीच्या उद्देशाने शस्त्राने हल्ला करत निर्घृण हत्या झाली होती. तसेच साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना टोकन पद्धतीने मोफत भोजन देण्याचा निर्णय संस्थानाने घेतला होता. आता मात्र शिर्डीत साईबाबा दर्शनासाठी आलेल्या एका परदेशी नागरिकाची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

फसवणुकीचा गुन्हा दाखल

शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची लूट थांबत नसल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. आताही साई दर्शनासाठी परदेशातून आलेल्या एका भाविकाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पूजा साहित्याच्या नावाखाली त्या भाविकाची चार हजारांची फसवणूक करण्यात आली. बलदेव राममेन असे फसवणूक झालेल्या परदेशी नागरिकाचे नाव आहे. तो यूकेमधील रहिवाशी आहे. बलदेव राममेन याने याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना ताब्यात घेतले आहे.

नेमकं काय घडलं?

बलदेव राममेन हा साई मंदिरात दर्शनसाठी आला होता. त्यावेळी साई मंदिरात चढवण्यात येणाऱ्या पूजा साहित्याच्या नावाने भाविकाची फसवणूक करण्यात आली. त्या भाविकाने घेतलेल्या पूजा साहित्याची किंमत पाचशे रुपये होते. मात्र त्याला हे साहित्य चार हजार रुपयांना विकण्यात आले. त्यामुळे त्याची पूजा साहित्यांच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली.

दोन आरोपी ताब्यात

याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याद्वारे फुलभांडार दुकानावर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी प्रदीप त्रिभुवन आणि सूरज नरोडे असे या दोघांचे नाव आहे. या दोघांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर दुकान मालक आणि जागा मालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाविकांची फसवणूक केल्याबाबत शिर्डी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला गेला आहे. शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.