संजय राऊत याचं नवं पुस्तक येणार, या वेळी नेमके कोणते गौप्यस्फोट, पुस्तकाचे कव्हर झळकवले
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे नवे पुस्तक वाचकांच्या भेटीला येत आहे. या पुस्तकात आता ते कोणते खुलासे करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांचे नवे पुस्तक येत असल्याची घोषणा त्यांनी एक्स माध्यमातून केली आहे. त्यांनी आधी ‘नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात त्यांनी आर्थररोड कारागृहातील आपले अनुभव कथन केले आहेत. या नव्या पुस्तकात नेमके आता संजय राऊत कोणते धक्कादायक खुलासे करता याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नव्या पुस्तकाचे कव्हर पेज संजय राऊत यांनी एक्स माध्यमावर झळकवले आहे.
येथे पोस्ट वाचा –
संजय राऊत यांची अनेक पुस्तके यापूर्वी प्रसिद्ध झाली आहेत. दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक असलेल्या संजय राऊत यांनी याआधी गुन्हेगारी विश्व, तसेच त्यांच्या दैनिक सामनातील लोकप्रिय सदरं रोखठोक, सच्चाई तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ‘फटकारे , एकवचनी (भाग १ आणि २), युगान्त, चेक मेट, हेप्सीचे वादळ, सुन्न करणारे दिवस, अशी अनेक पुस्तके याआधी आली आहेत. मात्र, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आर्थर रोड कारागृहात काढलेल्या १०४ दिवसांच्या अनुभवांवर त्यांनी लिहिलेले ‘नरकातला स्वर्ग’ हे त्यांचे पुस्तक जास्त गाजले होते. आता त्यांचे नवीन पुस्तक ‘बोध किर्तन’ काय खळबळ माजवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संजय राऊत यांचे तुरुंगातील दिवसांवर आधारित ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक जेव्हा प्रकाशित झाले होते. त्यावेळी राजकारणात खळबळ उडाली होती. ईडी चौकशीचा ससेमिरा लागूनही राऊत यांनी न झुकता तुरुंगात जाणे पसंद केले होते. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये या पुस्तकाबद्दल अधिकच आत्मियता होती. या पुस्तकावर आधारित एक मुलाखत मध्यंतरी वकील कपिल सिब्बल यांनी त्यांच्या युट्युब चॅनलवर घेतली होती. त्यावेळी संजय राऊत यांनी तुरुंगात त्यांना घरातील जेवणाची जेव्हा परवानगी मिळाली त्यावेळचा अनुभव सांगितला आहे. हा डब्बा सतरा वेळा तपासला जात होता. त्यात त्यांच्या आईने सणाच्या दिवशी दोन लाडू पाठवले होते. ते लाडू देखील तपास अधिकाऱ्यांनी जप्त केले होते असा अनुभव सांगितले होता. तसेच गुजरातचे गृहमंत्री अमित शाह यांना सोडवण्यासाठी तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांकडे शिवसेना प्रमुखांनी शब्द टाकावा अशा केलेल्या विनंतीचाही गौप्यस्फोट केला होता.
हे पुस्तक अराजकीय पुस्तक
या घटना-गोष्टी सामन्य व्यक्ती, प्रसिद्ध व्यक्ती, व्यावसायिक, राजकारणी, कलावंत अशा कुणाच्याही दैनंदिन आयुष्यात घडलेल्या आहेत. त्या घटना खाणं-पिणं-आहार-लाईफस्टाईल-व्यवसाय या आणि अशा अनेक विषयांशी संबंधित आहेत. काही घटना-गोष्टी मजेशीरही आहेत. या सगळ्या घटना-गोष्टींतून बोधही घेता येऊ शकतो. त्यामुळे पुस्तकाचे नाव बोध कीर्तन असे असावे.
संजय राऊत यांची आजवर प्रकाशित झालेली पुस्तके ही पूर्णपणे राजकीय विषयांवर आधारित होती. गेल्या वर्षी मे महिन्यात प्रकाशित झालेल्या संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाने विक्रीचे विक्रम रचले. ईडी अटकेच्या काळातले तुरुंगातले अनुभव संजय राऊत यांनी या पुस्तकात मांडले. पुस्तकातील अनेक राजकिय गौप्यस्फोटांनी खळबळ माजली होती. पण यंदा संजय राऊत यांनी पुस्तक लिखाणात वेगळा प्रयोग केला आहे. या दिवाळीपर्यंत हे पुस्तक प्रकाशित होणे अपेक्षित आहे.