उद्धव ठाकरे सोनिया गांधी अन् शरद पवारांना घाबरले, यामुळेच…शहाजी बापू यांचा टोला

Shahajibapu Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी प्रयागराजला जायला पाहिजे होते, कारण 2019 साली फडणवीस यांच्या पाठीत त्यांनी खंजिर खुपसले होते. त्यांचे ते पाप महाकुंभात धुतले गेले असते, असा टोला शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

उद्धव ठाकरे सोनिया गांधी अन् शरद पवारांना घाबरले, यामुळेच...शहाजी बापू यांचा टोला
shahajibapu uddhav thackeray
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Feb 28, 2025 | 3:38 PM

shahajibapu uddhav thackeray: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे महाकुंभात गेले नाही. हिंदुत्ववादी असणाऱ्या पक्षाचे नेते प्रयागराज गेले नसल्याने शिवसेना नेते व माजी आमदार शाहजी बापू पाटील यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. सोनिया गांधी आणि शरद पवार यांना घाबरून उद्धव ठाकरे प्रयागराजला गेले नाहीत. हिंदू हा शब्द उद्धव ठाकरे यांच्या तोंडी शोभत नाही. त्यांनी प्रयागराजला जायला पाहिजे होते, कारण 2019 साली फडणवीस यांच्या पाठीत त्यांनी खंजिर खुपसले होते. त्यांचे ते पाप महाकुंभात धुतले गेले असते, असा टोला शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

राऊत यांनी खासदारकी विसरावी

अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर विधानसभा डोळ्यासमोर ठेवून झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, संजय राऊत यांना कुठेही उठता, बसता, झोपता फक्त राजकारण दिसते. समाजाचे हित या माणसाला दिसत नाही. बुद्धि भ्रष्ट झालेला राजकारणातील माणूस म्हणजे संजय राऊत आहे. संजय राऊत याने आता आपल्या खासदारकीची काळजी करावी. पुन्हा आयुष्यात आमदाराही नाही आणि खासदारकीही त्यांना मिळणार नाही. त्यामुळे निवांत नारळाच्या झाडाखाली पुस्तक वाचत बसावे, अशी टीका शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

संजय राऊत महाभारतातील संजय का?

शहाजी बापू म्हणाले, निवडणुकीत नेमकं कुणी कुणाचा प्रचार केला हे उमेदवाराला ही समजत नाही. आपला प्रचार कोण करतोय आणि विरोध कोण करतोय आणि संजय राऊत यांना मुंबईत बसून पुण्यातली प्रचार यंत्रणा कशी दिसायला लागली? हा महाभारतातला संजय आहे का? असे वाटण्यासारखे विधान संजय राऊत करत आहे. गुवाहाटीला जाऊन केलेला उठाव आणि त्या उठावाला मिळालेले जागतिक पातळीवरचे यश हीच पोटदुखी संजय राऊताची झालेली आहे.

वाल्मीक कराडचे जेलमध्ये लांगूलचालन जर होत असेल तर ही गंभीर बाब आहे. जेलमधील आरोपींना सहकार्य करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. त्यांना निलंबित केले पाहिजे, अशी मागणी शहाजी बापू पाटील यांनी केली.