पालघरमधून अपहरण, गुजरातमध्ये मृतदेहाची विल्हेवाट, अन् राजस्थानातून… अशोक धोडी प्रकरणातील आणखी एक मोठी अपडेट समोर

शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. पोलिसांनी फरार आरोपींची स्कॉर्पिओ गाडी राजस्थानमधून ताब्यात घेतली आहे. राजस्थान कनेक्शन समोर आल्यानंतर तपासात वेगळाच वळण लागले आहे.

पालघरमधून अपहरण, गुजरातमध्ये मृतदेहाची विल्हेवाट, अन् राजस्थानातून... अशोक धोडी प्रकरणातील आणखी एक मोठी अपडेट समोर
ashok dhodi death
| Updated on: Feb 04, 2025 | 6:51 PM

शिवसेनेचे पालघरचे पदाधिकारी अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. तब्बल ११ दिवसांनी अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला. गुजरातमधील भिलाड पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या सरिग्राम येथील एका बंद दगड खाणीच्या पाण्यात 40 फूट खोल त्यांची गाडी सापडली. याच गाडीत त्यांचा मृतदेह सापडला. कौटुंबिक वाद आणि इतर वादातून त्यांच्या भावानेच त्यांची हत्या केल्याचे उघड झाले आहे. सध्या याप्रकरणी विविध खुलासे समोर येत आहेत. आता अशोक धोडी यांच्या हत्येप्रकरणी राजस्थान कनेक्शन उघड झाले आहे.

शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक धोडी हत्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपींची स्कॉरपिओ गाडी पालघर पोलिसांच्या हाती लागली आहे. या गाडीचा वापर मुख्य आरोपी अविनाश धोडी वगळता अन्य दोन आरोपींनी फरार होण्यासाठी केला होता. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातून पालघर पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

तब्बल 16 दिवसांनी फरार आरोपींची कार ताब्यात

राजस्थानमधील फरार आरोपीने ताब्यात घेतलेल्या गाडीतून त्याची पत्नीला घेऊन आपल्या मित्राच्या घरी सोडले. त्यानंतर ती गाडी त्याच मित्राच्या घरी लावून तेथून दुसऱ्या गाडीने फरार झाल्याचे पाहायला मिळत आहे. तब्बल १६ दिवसांनी फरार आरोपींची स्कॉर्पिओ कार पोलिसांनी राजस्थानमधून हस्तगत केली आहे. पोलिसांनी राजस्थान येथील पाली जिल्ह्यात जाऊन ही स्कॉर्पिओ कार ताब्यात घेतली आहे.

अशोक धोडी अपहरण आणि हत्येप्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 3 आरोपी हे फरार आहेत. यात त्यांचा सख्खा भाऊ अविनाश धोडीचा समावेश आहे. या फरार आरोपींच्या तपासासाठी पालघर पोलिसांच्या 6 टीम राजस्थान, पाली, पालघरच्या विविध भागात तपास करीत आहेत.

आरोपींवर कठोर कारवाई करा- मुलाची मागणी

दरम्यान अशोक धोडी यांचा मृतदेह शोधण्यात पालघर पोलिसांना यश आल्याने अशोक धोडी यांचा मुलगा आकाश धोडी यांनी पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं आहे. मात्र माझ्या वडिलांचा जीव गेला, त्याप्रमाणे आरोपींना देखील फाशीची शिक्षा द्यावीस अशी मागणी त्याने केली आहे. तसेच आमच्या कुटुंबियांनाही आरोपीपासून धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच मुख्य आरोपी अविनाश धोडी याला लवकरात लवकर अटक करून त्याला फाशीची शिक्षा करावी, अन्यथा आमच्या गावातील नागरिकांना देखील त्याच्यापासून धोका असल्याच देखील आकाश धोडी म्हणाला. अविनाश धोडी पोलिसांच्या ताब्यात असताना त्याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करावी. तसेच त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आकाश थोडी यांनी केली.