बाळासाहेब जाण्याची वाट पाहत होते उद्धव ठाकरे, रामदास कदम यांचा खळबळजनक आरोप

विलेपार्लेचे उपविभागप्रमुख जितेंद्र जनावळे यांनी उद्धव ठाकरे गट सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केली. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आणि शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या विचारांना दुर्लक्ष केल्याबद्दल आक्षेप घेतला.

बाळासाहेब जाण्याची वाट पाहत होते उद्धव ठाकरे, रामदास कदम यांचा खळबळजनक आरोप
Ramdas kadam uddhav thackeray balasaheb thackeray
| Updated on: Feb 18, 2025 | 9:29 PM

मुंबईतील विलेपार्लेमधील उपविभागप्रमुख जितेंद्र जनावळे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. जितेंद्र जनावळे यांनी उपविभागप्रमुखपदाचा राजीनामा देत शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले. यावेळी जितेंद्र जनावळे यांच्यासोबत अनेक जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेता रामदास कदम उपस्थित होते. यावेळी रामदास कदम यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे हे त्यांच्या पापाची फळं भोगत आहे, असे रामदास कदम म्हणाले.

रामदास कदम यांनी जितेंद्र जनावळे यांच्या पक्षप्रवेशावेळी जोरदार भाषण केले. शाखांप्रमुखांचे खूप मोठं काम आहे. शाखाप्रमुख आणि मी पालिकेवर ‌१९८५ साली मोर्चा काढला होता. मनोहर जोशी सारख्या नेत्यांना स्टेजवरुन खाली उतरवलं. लीलाधर डाके सारख्या लोकांना वर्षावर प्रवेश नव्हता. मुंबई पालिका निवडणुकीची वाट पाहतोय. उद्धव ठाकरे त्यांच्या पापाची फळं भोगत आहे. खरी शिवसेना कोणाची हे तुम्हाला कळालं का? उद्धव ठाकरे ठीक आहे, पण त्यांचा तो टिल्लू अशा शब्दात रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांची ‌पायमल्ली केली

“खोके खोके खूप बोलत होते. हे खोके तुम्ही खूप खाल्ले. मातोश्रीत गेलेली मिठाई परत यायची नाही. थोडे दिवस थांबा तुम्हाला मिंधे कोण ते कळेल. स्वाभिमानी नेत्यांचं‌ नाव एकनाथ शिंदे आहे. तुम्ही काँग्रेसबरोबर युती केली आणि हिंदुत्व सोडलं. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांची ‌पायमल्ली केली. बाळासाहेबांचे ‌खरे विचार हे एकनाथ शिंदे घेऊन जात आहेत. उद्धव ठाकरे अफजलखानासारखे खेडमध्ये चालून आलेले. पण आम्ही टिकून दिला नाही”, असेही रामदास कदम म्हणाले.

“बाळासाहेब गेल्यानंतर त्यांनी…”

“उद्धव ठाकरे हे बाळासाहेब जाण्याची वाट बघत होते. बाळासाहेब गेल्यानंतर त्यांनी मनमानी कारभार सुरु केला. मुंबई महापालिका उद्धव ठाकरे यांच्याकडे होती. पण त्यांनी मराठी माणसासाठी काहीही केले नाही. मराठी माणसाला यांनी बोरिवली आणि ठाण्याच्या पुढे घालवले आहे. मुंबईची वाट लावण्यात अनिल परब हे हेडमास्तर आहेत. सांताक्रूझमध्ये कोण पार्टनर आहे. ही माणसं सगळी बाहेर का गेली आणि कोणी पाठवली. गृहनिर्माण असताना सगळं काही घालवलं”, असा आरोप रामदास कदम यांनी केला.

“मला संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं”

“आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहनिर्माण आहे. आता कसे निर्णय होणार ते बघा. मला सत्तेत असताना महामंडळ दिला नाही पण बाकी सगळ्यांना दिले. मी कंटाळून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलो आणि विचारलं तर ते मला म्हणाले की मला उद्धव ठाकरे यांनी द्यायला सांगितलं नाही. माझं मंत्री पद पण नेलं आणि त्या आदित्यला दिला. ते येऊन बसायचे माझ्या केबिनला मला वाटलं ते सत्कार करतात. मला गुहागरमध्ये देखील त्यांनीच पाडले. मला संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केला”, असा आरोप रामदास कदम यांनी केला.

“उद्या निवडणुका लागल्या तरी आपण तयार असलं पाहिजे”

“उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी ब्लॅकमेल केला. मी इथे सगळ्यांना सांगतो, सगळे एक व्हा आणि आपला भगवा सगळीकडे फडकवा. त्या मातोश्री मध्ये आता काय चालत ते बघा सगळ्यांना माहित आहे. आपलं हे सगळं कुटुंब आहे. पक्षाची जाणीव आपल्याला असली पाहिजे आणि त्यात आपण सगळ्यांनी काम केला पाहिजे. आपण जोमाने काम केलं पाहिजे जर उद्या निवडणुका लागल्या तरी आपण तयार असलं पाहिजे”, असेही रामदास कदम म्हणाले.