
Sanjay Shirsat On Eknath Shinde Politics : महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. महायुतीला बहुमत मिळालेलं असताना अद्याप मुख्यमंत्री कोण होणार? हे निश्चित झालेले नाही. तर दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिदें यांनी गृहमंत्रीपदावर दावा केला आहे. मात्र भाजपने हा दावा फेटाळून लावला आहे. त्याउलट एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरुन आता राजकारण रंगलेले असताना ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेऊ नका, असा सूचक इशारा शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी दिला आहे.
संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. राज्यात चांगलं काम व्हावं यासाठी या खात्यांवर आम्ही दावा केलेला आहे. संजय राऊत आणि त्यांचे पक्षांनी आमच्यावर जो लिंबू फिरवला होता त्याचा उतारा करण्यासाठी मुख्यमंत्री इतना शिंदे दरेगावी गेलेत, असे संजय शिरसाट म्हणाले.
“शेतकऱ्याच्या मुलाचा अपमान करणं एवढं एकच काम संजय राऊतला आहे. संजय राऊतांमुळेच शिवसेना ठाकरे पक्ष संपला. संजय राऊतांमुळेच पवार यांच्या पक्षाला फटका बसला आणि अजूनही त्याची बडबड सुरूच आहे. आमच्या समन्वयाचा कुठलाही अभाव नाही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील आणि कुठली जागा कुणाला द्यायची कुठले खाते कुणाला वाटप करायचे याबद्दल संधी दिली जाईल. योग्य चर्चा होईल”, असेही संजय शिरसाट यांनी सांगितले.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दाढीवरून हात फिरवत आहे, तेव्हा तेव्हा राष्ट्रामध्ये मोठ्या काहीतरी घडतं. त्यामुळे ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेता कामा नये. हेच हलक्यात घेण्याचं काम ठाकरेंनी केलं आणि आता त्यांची काय अवस्था आम्ही करून ठेवली हे महाराष्ट्राने पाहिला. त्यामुळे जेव्हा ते येतील त्यानंतर सगळ्या घडामोडी घडतील. त्यांना कोणी हलक्यात घेता कामा नये, जर घेतलं तर मग राऊतांची काय अवस्था केली, त्यांच्या पक्षांची काय अवस्था केली हे तर सगळ्यांना माहितीच आहे”, असा सूचक इशारा संजय शिरसाट यांनी दिला.
दरम्यान सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्याने ते विश्रांतीसाठी गावी गेले आहेत. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस एकनाथ शिंदे हे दरेगावात मुक्कामी आहेत. आज ते मुंबईत परतणार आहेत. यानंतरच महायुतीच्या बैठका होतील, असे सांगितले जात आहे.