
सध्या आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. यात भाजपही आघाडीवर आहे. याच संदर्भात सामाजिक मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकांवर भाष्य केले.
संजय शिरसाट यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी संजय शिरसाट यांनी महापालिका निवडणुकीत मोठा भाऊ कोण? या प्रश्नावर भाष्य केले. “कोण छोटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ हे अजून ठरलेले नाही. याला अजून वेळ आहे. आताच याबाबत काही सांगितले तर वाद निर्माण होऊ शकतो. कोणत्या ठिकाणी कोणता पक्ष निवडणूक लढवतो, त्यानंतरच सर्वेक्षणांना महत्त्व येईल, असे संजय शिरसाट म्हणाले.
निवडणुकीच्या काळात पक्ष सर्व्हे करतात. त्यानुसार फीडबॅक घेऊन अहवाल पक्षाकडे सादर करतात. विधानसभेत असे सर्व्हे झाले, मात्र त्यातील ८० टक्के सर्व्हे चुकीचे निघाले. त्यामुळे या अंदाजांवर राजकीय गणित बांधणे चुकीचे आहे. पक्षाची नेमकी परिस्थिती काय, याचा आढावा अशा सर्व्हेतून घेतला जातो,” असे संजय शिरसाट म्हणाले. हा सध्या प्राथमिक सर्व्हे आहे. यानंतर अजून दोन सर्व्हे होतील, असेही संजय शिरसाट यांनी म्हटले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्यावरही संजय शिरसाट यांनी भाष्य केले. “हा फक्त अंदाज आहे, हा सर्व्हे आहे, असेच घडेल असे मानून चालणे योग्य नाही. आपला भगवा मुंबई महापालिकेवर फडकला पाहिजे, असा विश्वासही संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.
शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीच्या चर्चांवर बोलताना संजय शिरसाट यांनी कालची बैठक पक्षाच्या ध्येयधोरणांबाबत आणि संघटनात्मक बाबींवर असल्याचे सांगितले. “काम करताना काय अडचणी येतात, याबाबत आमदारांनी सांगितले आहे. मात्र, शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितले आहे की, कुठेही वाच्यता करू नका. तिन्ही नेते मिळून मार्ग काढू असे म्हटले आहे, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.