IND vs SA : फायनलवर पावसाचं सावट? सामना रद्द झाल्यास मालिका विजेता कोण?
India vs South Africa 3rd Odi Weather Prediction : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगतदार स्थितीत आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. त्यामुळे तिसरा सामना हा निर्णायक असा असणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका अंतिम टप्प्यात आहे. उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा शनिवारी 6 डिसेंबरला विशाखापट्टणम इथे होणार आहे. 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना हा मालिकेच्या हिशोबाने निर्णायक ठरणार आहे. दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची समसमान संधी आहे. अशात या मालिकेवर कोणता संघ नाव कोरणार? याची उत्सूकचा क्रिकेट चाहत्यांना लागून आहे. दक्षिण आफ्रिका हा सामना जिंकून भारत दौऱ्यातील सलग दुसरी मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर टीम इंडियासमोर तिसरा आणि अंतिम सामना जिंकून कसोटी मालिकेतील पराभवाची परतफेड करण्याचं आव्हान असणार आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताला कसोटी मालिकेत 2-0 ने लोळवलं होतं.
भारताने रांचीत झालेल्या पहिल्या सामन्यात 17 धावांनी विजय मिळवला होता. तर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात 359 धावांचा यशस्वी पाठलाग करत टीम इंडियावर मात केली होती. दक्षिण आफ्रिकेने यासह मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात चढाओढ पाहायला मिळणार असल्याचं निश्चित आहे. तिसरा सामना पाऊस किंवा इतर कारणामुळे रद्द झाल्यास कोणता संघ मालिका विजेता ठरेल? तसेच विशाखापट्टणममध्ये हवामान कसं असेल? हे जाणून घेऊयात.
तिसऱ्या सामन्यादरम्यान हवामान कसं असेल?
एक्युवेदरनुसार, टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या सामन्यादरम्यान ढगाळ हवामान असेल. मात्र पावसाची शक्यता नाही. विशाखापट्टणममध्ये सामन्यात दरम्यान कमाल तापमान हे 27 अंश सेल्सियस इतके असेल. तर रात्री या तापमानात घट होऊन ते 19 अंश सेल्सियस इतके होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सामना रद्द झाल्यास मालिका विजेता कोण?
विशाखापट्टणममध्ये आयोजित भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना पाऊस किंवा इतर कोणत्याही कारणाने रद्द झाला तर मालिका विजेता कोण असणार? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. हा सामना रद्द झाल्यास मालिका 1-1 ने बरोबरीत राहिल. द्विपक्षीय मालिकेसाठी सुपर ओव्हर, राखीव दिवस यासारखे नियम नसतात.
टीम इंडियाची विशाखापट्टणममधील कामगिरी कशी?
दरम्यान टीम इंडियाचा विशाखापट्टणममधील हा 11 वा एकदिवसीय सामना असणार आहे. भारताने आतापर्यंत या मैदानात 10 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर 2 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. तर एकमेव सामना हा बरोबरीत सुटला होता.
