
पुण्यात एका हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. या पार्टीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पुण्यातील खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या हाऊस पार्टीवर करण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ, दारु आणि हुक्काचे सेवन सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजनांवर टीका केली आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पुण्यातील रेव्ह पार्टीच्या कारवाईवर भाष्य केले. “पुण्यातील रेव्ह पार्टीचा संपूर्ण प्रकार मला अजूनही संशयास्पद वाटत आहे. तिथे एखादी पार्टी सुरु असेल. चार दिवस खडसेंच्या जावयावर वॉच ठेवला होता. एवढा वॉच जर पहलगाममध्ये ठेवला असता, तर ते अतिरेक पळून गेले नसते. किंवा ती घटना घडली नसती. आमच्या महिलांचे कुंकू पुसले गेले नसते. ते अतिरेकी किमान झाल्यावर सापडले तरी असते”, अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली.
“काल गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावर असुरी आनंद होता. गिरीश महाजनांच्या चेहऱ्यावरील आनंद जर पाहिला असेल तर यामागे काय घडतंय, काय घडवलं हे तुमच्या लक्षात येईल. इतका आनंद गिरीश महाजनांना का झाला असावा की खडसेंचे जावयाला अटक केली किंवा तो पकडला गेला. माणसाला आपण मंत्री आहोत, हे भान त्यांना नाही. काल त्याचा उल्लेख की हा मोकाट सुटलेला सांड आहे, असे मी म्हटले आहे. हाच फडणवीसांना अडचणीत आणणार आहे”, असा दावाही संजय राऊत यांनी केला.
“या महाराष्ट्रातील सर्व दरोडोखोर, गुंड, बलात्काऱ्यांना एकत्र घेऊन यांनी पक्ष उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना रविंद्र चव्हाणांची साथ मिळते. नैतिकता या राज्याच्या राजकारणात राहूच नये, अशी भूमिका भाजपच्या नेत्यांनी घेतली आहे. काल रेव्ह पार्टीचा जो प्रकार झाला तो खरा असेल तर त्याची निष्पक्ष पणे चौकशी केली तर त्यात कठोर कारवाई व्हायची ती होईल. पण गिरीश महाजन हे फक्त नाचायचे बाकी होते. त्यांची बॉडी लँग्वेज तशीच होती. राजकारणात आम्ही कुटुंबापर्यंत जात नाही, हे आम्ही पाळतो. दुर्दैवाने भाजपचे लोक हे सर्व करतात. कुटुंबापर्यंत जातात, बदनाम करतात. खडसे तीन दिवस हनी ट्रॅपवर बोलतात, त्यांची चौकशी करा असे सांगतात. त्या हनी ट्रॅपमध्ये गिरीश महाजानांच्या सहभागाविषयी बोलतात. त्यावर तपास नाही. अचानक खडसे बोलतात म्हणून त्यांच्या जावयाला अटक केली”, असे संजय राऊतांनी म्हटले.