
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये पक्षाच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त एक जोरदार भाषण दिले. आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी ऑपरेशन सिंदूर आणि पुलवामा हल्ल्यावर भाष्य करत भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार शाब्दिक प्रहार केले.
हिंदुत्वाची व्याख्या करताना शिवसेनाप्रमुखांनी (बाळासाहेब ठाकरे) सांगितलं, माझं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आम्ही राष्ट्रधर्म पाळणारे हिंदुत्ववादी आहोत. हा देश आपला मानतो तो आमचा आहे. देशासाठी कुर्बानी देणारा कोणी असो तो आमचा आहे.” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट केली. भाजपच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ उपक्रमावर उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दांत टीका केली. “यांना नावं बरी सूचतात. ऑपरेशन सिंदूर. घरोघरी जाऊन हे सिंदूर वाटणार होते. कोण वाटणार? भ्रष्ट लोक. ज्यांना जोड्याने हाणलं पाहिजे, हे लोक आमच्या माता-भगिनींना सिंदूर वाटतात. त्यांच्याकडून सिंदूर घेणार असं वाटलं त्यांना.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपला विचारायचं आहे, तुमचं हिंदुत्व आहे तरी काय? जो शेंदूर तुम्ही वाटत होतात. आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणता, मग तुम्ही काय सोडलं? कारण मध्येच मशिदीत जाऊन सौगात वाटता. मध्येच घराघरात जाऊन शेंदूर वाटता. “शेंदूर कोण वाटणार तो नालायक विजय शाह. आपल्या भगिनी सौफिया कुरेशी या मोठ्या पदावर आहेत. त्या बाणेदारपणे आपली बाजू मांडतात. तिला विजय शाह ‘पाकिस्तान की बहन, आतंकवादीओंकी बहन’ म्हणतो. असे नालायक लोक देश सुधारणार?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी परराष्ट्र धोरणावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. “आम्ही इंडियन मुजाहिद्दीन. तुम्ही कोण? तुम्ही जगभर फिरलात. पण कठिण काळात एक देश तुमच्या बाजूने राहिला नाही. आम्ही उभे राहिलो. देशातील मित्र तोडून टाकत आहात. संकट आल्यावर आमचे खासदार जगभरात पाठवत आहात, आम्ही काय केलं सांगायला. मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा डोकलाम झालं तेव्हा हीच भूमिका होती की पंतप्रधान, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. आताही तीच भूमिका होती. पक्ष, मतभेद राहतील, पण देश म्हणून आपण एकत्र आहोत. ते करण्याचा प्रयत्न आम्ही केला.”
पुलवामा हल्ल्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. “तुम्ही सैन्याचे पाय बांधले. नाही तर पाकिस्तान घेतलाच असता. पण ट्रम्पचा फोन आल्यावर आवाजच गेला. काय करायचे असे पंतप्रधान? काय करायचे असे गृहमंत्री? युक्रेन की वार रुकवादी पापा. चार अतिरेकी आलेच कसे? अतिरेकी गेले कुठे? पाताळात गेले, आकाशात गेले की भाजपात गेले? मिळत कसे नाहीत? सांगता येत नाही. गेले असतील, घेतले असतील. आता फक्त दाऊदला घ्यायचं बाकी आहे. बाकी सर्व झालं आहे.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“भाजपने नवीन सदस्य नोंदणी सुरू केली. जेलच्या तुरुंगाबाहेरच स्टॉल टाकले. इथे येतो की तिथे जातो. लोकांना आयुष्यातून उठवायचं. भ्रष्टाचारी म्हणून बोंबाबोंब करायचे. एसआयटी लावू हे लावू ते लावू. मग एसआयटीची एसटी झाली का?” असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या विरोधातील आपली भूमिका स्पष्ट केली.