कंडोम, साडी, ब्लेड… पण प्लॅन फसला; गोपिचंद पडळकरांचा कार्यकर्ता अपहरण प्रकरणात खळबळजनक माहिती समोर

काही दिवसांपूर्वी गोपिचंद पडळकर यांचा कार्यकर्ता असलेल्या शरणू हांडे यांचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती, या प्रकरणात आता खळबळजनक माहिती समोर आली आहे.

कंडोम, साडी, ब्लेड... पण प्लॅन फसला; गोपिचंद पडळकरांचा कार्यकर्ता अपहरण प्रकरणात खळबळजनक माहिती समोर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 10, 2025 | 6:21 PM

काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांचे कार्यकर्ते असलेले शरणू हांडे यांचं अपहरण करून त्यांना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. शरणू हांडे यांच्या अपहरणावेळी आरोपीने कंडोम, साडी, ब्लेड आणि ट्रायपॉड सोबत बाळगले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.  आरोपी अमित सुरवसे यांने या सर्व वस्तू सोबत का बाळगल्या होत्या याबाबत, आता वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत.

या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अमित सुरवसे याला  शरणू हांडे यांनी 3 महिन्यापूर्वी मारहाण केली होती, या मारहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.  याच अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपी अमित सुरवसे याने शरणू हांडे यांचं अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरणू हांडे यांना साडी घालून, त्यांचे पुष्पा चित्रपटातील सीनप्रमाणे अर्धे टक्कल करुन नाचायला लावायचे आणि त्याचे व्हिडीओ ट्रायपॉडवरून शूट करुन, हे व्हिडीओ व्हायरल करायचे, असा प्लॅन अमित सुरवसे याचा होता.  मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे अमित सुरवसे याचा हा प्लॅन फसल्याचे समोर आले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

पूर्व वैमनस्यातून गोपिचंद पडळकर यांचे कार्यकर्ते असलेले शरणू हांडे यांचं अमित सुरवसे याने  अपहरण केलं होतं, त्यांना बेदम मारहाण देखील करण्यात आली, परंतु पोलीस वेळीच पोहोचल्यानं मोठा अनर्थ टळला, पोलिसांनी या प्रकरणात अमित सुरवसे आणि त्याच्या काही साथिदारांना अटक देखील केली आहे.

दरम्यान शरणू  हांडे यांची आमदार गोपिचंद पडळकर यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर काही आरोप केले. पडळकर यांच्या या आरोपांनंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांना प्रत्यु्त्तर दिलं, त्यांनी पडळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता, त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं.