कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार, देशव्यापी आंदोलनामुळे पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग
Cockroach Janata Party : कॉक्रोच जनता पार्टीने आज देशव्यापी आंदोलनाची हाक दिली असून, मोठ्या संख्येने आंदोलक मोर्चासाठी एकत्र येणार आहेत. त्यामुळे पुण्याच्या वाहतुकीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेत. तर जाणून घ्या पर्यायी मार्ग

कॉक्रोच जनता पार्टीने 20 जुलै रोजी जंतरमंतर ते संसदेपर्यंत मोर्चा पुकारलेला आणि मोर्चासाठी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी दिल्लीत पोहोचले. आता सीजेपीकडून 24 जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनात अनेक विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांनी शांततापूर्ण मार्गाने सहभागी होण्यासाठी सीजेपीने आवाहन केलं आहे. आंदोलनाच्या पाश्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, प्रवास करताना नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करवा, असं आवाहन पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून एक्सवर एक अधिकृत पोस्ट शेअर करण्यात आली आहे. पोस्टमधून सांगण्यात आलं आहे की, आज नियोजित मोर्चा व आंदोलनाच्या अनुषंगाने काही प्रमुख मार्गांवर तात्पुरते वाहतूक बदल करण्यात आले आहेत. कृपया प्रवासाचे नियोजन करताना पर्यायी मार्गांचा वापर करा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करा.
आज नियोजित मोर्चा व आंदोलनाच्या अनुषंगाने काही प्रमुख मार्गांवर तात्पुरते वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
कृपया प्रवासाचे नियोजन करताना पर्यायी मार्गांचा वापर करा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करा.#TrafficAdvisory #PuneTrafficUpdate #StayAlert #PublicNotice pic.twitter.com/WVw2CQtHfG
— पुणे शहर वाहतूक पोलीस (@PuneCityTraffic) July 24, 2026
पुण्यात वाहतुकीत तात्पुरते करण्यात आलेले महत्त्वाचे बदल…
मोर्चाची सुरुवात लाल महाल येथून सुरु होणार असून पुढे फडके हैद, दारुवाला पूल, नरपतीगिरी चौक, बेलाई माता मंदिर चौक, जिल्हाधिकारी कर्यालयापर्यंत मोर्चा असणार आहे…
वाहतुकीत करण्यात आलेले बदल
| प्रभावित मार्ग | पर्यायी मार्ग |
| गणेश रोड | लक्ष्मी रोड |
| केळकर रोड | सूर्या हॉस्पिटल – 15 ऑगस्ट चौक मार्ग |
| शिवाजी रोड | एबीसी – फुटका बुरुज मार्ग |
| नेहरु रोड | जंगली महाराज रोड / नदीपात्र/ टिळक रोड बॅनर्जी चौक – नेहरु मेमोरियल मार्ग |
पुणे शहर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत करण्यात आलेले बदल सांगत नागरिकांना आवाहन केलं आहे की, प्रभावित मार्ग टाळून पर्यायी मार्गाचा वापर करा. वाहतून पोलिसांच्या सूचनांचं पालन करुन सहकार्य करा… सध्या ही पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे.