
Anjali damania Not Participate in Beed Morcha : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध व्यक्त करण्यात येत आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन आज सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी हा मूक मोर्चा काढला जाणार आहे. आता या मूक मोर्चातून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माघार घेतली आहे. त्यांनी स्वत: याबद्दलची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी यामागचे कारणही सांगितले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकतंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अंजली दमानिया यांनी बीडमधील मोर्चात सहभागी होणार नसल्याचा सांगितले.
“काही राजकीय नेते हा ड्रामा करत आहेत, असे मला कुठेतरी वाटत आहे. संतोष देशमुखांचे कुटुंब या मोर्चात जाणार आहेत. अनेकजण या मोर्चात जातील. पण मी आजच्या मोर्चात सहभागी होणार नाही”, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
“कारण या मोर्चात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला पूर्ण कल्पना आहे की धनंजय मुंडे कसे आहेत. काही महिन्यांपूर्वी शरद पवारांनी धनंजय मुंडे कसे आहेत, हे सांगितलंही होतं. त्यावेळी त्यांनी धनंजय मुडेंचे अनेक कारनामे आम्ही पाठीशी घातले होते. यातील एक कारनामा म्हणजे वाल्मिक कराड. या अशा लोकांना पुढे करुन जी दहशत पसरवली जाते, ती कुठेतरी थांबवायला हवी. त्यामुळे आम्ही या मोर्चात न भाग घेता, कलेक्टरच्या ऑफिसबाहेर बसणार आहोत. ज्या कोणाला त्यात साथ द्यायची असेल, त्यांनी द्यावी. पण जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही आणि धनंजय मुंडेंचे मंत्रिपद सोडायला आम्ही भाग पाडत नाही, तोपर्यंत आम्ही तिथे ठिय्या आंदोलन करणार आहोत”, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.
“आम्हाला धनंजय मुंडेंसारखे मंत्री नको. जे आमच्या राज्यासाठी कायदे बनवणारे मंत्री जर गुन्हेगार असतील, त्या प्रवृत्तीचे असतील, तर असे मंत्री आम्हाला नको. त्यामुळे या सारख्या मंत्र्यांना राजीनामा द्यायला आम्ही भाग पाडू आणि बीडची जनताही त्यांना भाग पाडेल”, याची मला खात्री आहे, असेही अंजली दमानियांनी सांगितले.