सोलापूर पुन्हा हादरलं! भर रस्त्यात गाडी अडवून हल्ला, दगडाने ठेचून तरूणाला संपवलं

Solapur Crime : तरूणाच्या हत्येने सोलापूर हादरलं आहे. शहरातील 70 फूट रोडवर 5 जणांच्या टोळक्याने एका तरूणाचा भरदिवसा खून केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

सोलापूर पुन्हा हादरलं! भर रस्त्यात गाडी अडवून हल्ला, दगडाने ठेचून तरूणाला संपवलं
Solapur Murder
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: May 03, 2026 | 3:30 PM

गेल्या काही काळापासून राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी खून-मारामारीच्या घटना समोर आल्या आहेत. असातच आता तरूणाच्या हत्येने सोलापूर हादरलं आहे. शहरातील 70 फूट रोडवर 5 जणांच्या टोळक्याने एका तरूणाचा भरदिवसा खून केला आहे. या घटनेचा अंगावर काटा आणणार व्हिडिओही समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. सोलापुरात भरदिवसा नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भरदिवसा तरुणाची हत्या

सोलापूरमध्ये वर्चस्ववादातून भर रस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सुरेश श्रीराम असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुरेशला 5 आरोपींनी भर रस्त्यात गाडी आडवून कोयत्याने हल्ला केला. त्यानंतर त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आता पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली आहे.

पोलिसांकडून तपासाला सुरुवात

सोलापूर शहरातील 70 फूट रोडवर सुरेश श्रीराम याची दुचाकी अडवत त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. पाच ते सहा जणांच्या हल्ल्यामुळे सुरेशला प्रतिकारही करता आला नाही. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्याचा अवघ्या काही सेकंदांमध्ये जीव गेला. वराह पालनावरून आरोपी आणि मयत सुरेशमध्ये पूर्वीपासून वाद होता अशी माहिती समोर आली आहे. तसेच मृत सुरेश श्रीरामवर एकूण 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या 6 पैकी 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाच्या तपासाला सुरूवात केली आहे.

काल सोलापुरात तिहेरी हत्याकांड

काल सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावात ट्रिपल मर्डर झाला होता. बोरामणी गावात आई आणि दोन मुलांची तलवारीने हल्ला करून जखमी केल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. प्रॉपर्टीच्या वादातून तिघांची हत्या केल्याची माहिती समोर आली होते. गायत्री सुधाकर मस्के, बारावीत शिकणारी प्रिया मस्के आणि दहावीत शिकणारा शिवराय मस्के अशी हत्या झालेल्या तिघांची नावे आहेत तर पपू मस्के असे संशयित आरोपीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्री बाराच्या सुमारास आरोपीने हे कृत्य केल्याचे समोर आले होते. आई आणि मुलगी यांचा मृतदेह गच्चीवर तर मुलाचा मृतदेह हा बैठकीच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. आता पप्पू मस्के याच्यासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow Us