
शितलकुमार मोटे, प्रतिनिधी, सोलापूर : शेवग्याच्या शेंगा विकून मालामाल होणारे शेतकरी आपण पाहिलेले आहेत परंतु शेवगा शेतीतून पाला व त्यापासून पावडर तयार करून थेट अमेरिकेत निर्यात करण्याचा विक्रम करमाळा तालुक्यातील साडे येथील युवा शेतकर्यांनी नोंदवला आहे. अशा प्रकारचा अभिनव प्रयोग करून त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसमोर एक नवीन आदर्श ठेवला आहे. पारंपारिक शेतीसोबतच त्यांनी ही वेगळी वहिवाट निवडली आणि त्यातून त्यांना चांगली कमाई होत आहे.
शेवग्यातून लाखोंची कमाई
महादेव मोरे या शेतकर्याने तब्बल साडेसात एकरावर शेवगा शेती केली आहे. शेवग्याच्या पालापासून पावडर करून ते हवाबंद ड्रम मध्ये 25 किलो प्रमाणे भरून अमेरिकेला पाठवत आहेत. त्यातून त्यांनी लाखो रुपये कमावलेले आहेत. सुरुवातीस दुष्काळामध्ये एक एकर शेवगाची शेती मोरेंनी केली होती. कोरोनामध्ये शेवग्याची शेती नुकसानीत गेली, त्यातून झालेला खर्च सुद्धा निघाला नाही. त्यानंतर शेवग्याच्या शेंगांना विकता शेवग्याच्या पालाची पावडर करून विक्री करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
युट्यूब आले मदतीला
शेवग्याच्या शेंगा चर्चेत असल्या तरी शेवग्याचा पाला कधीही चर्चेत नव्हता. पण त्याची पावडर करून विकण्याची कल्पना त्यांना गुजरात मधील शेवगा शेती युट्यूबवर पाहिल्यानंतर सुचली. सुरुवातीला एक ते दीड एकरात शेवग्याच्या पालाचा पावडर प्रयोग केला. देशात कोलकत्ता, हैदराबाद, नागपूर, मुंबई आणि पुणे येथे पाव किलो पासून दोन किलो पर्यंत शेवगा पाल्याची पावडर विक्री केली जाते. शेवगा पाला पावडर उत्पादन एकरी 4 ते 5 टन पहिल्या वर्षी निघाले. सदर प्लॉट 8 ते 10 वर्षे चालतो. 8 ते 10 दिवसांतून एकदा पाणी द्यावे लागते.
शेवगा आरोग्यासाठी सर्वोत्तम
बीपी, शुगर सह 300 आजारावर शेवगा हे गुणकारी औषध आहे. शेवगा हा शुगर बीपीसह 300 प्लस आजारावर गुणकारी औषध आहे. मुतखडा आणि मुळव्याध हे या रोगावर शेवग्याची मात्रा लागू पडते. सर्वच रोगांवर शेवगा गुणकारी आहे. शेवगा पाला, मुरिंगा पावडर औषधीसाठी उपयोगात आणली जाते.
कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत न वापरता गांडूळ खत व शेणखत त्याशिवाय शेवग्याच्या पालापासून तयार झालेली लिक्विड म्हणून द्यावी लागते. शेवगावर रोगराई नसल्याने फवारणी करण्याची गरज नाही. या शेतीसाठी 70 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. या शेतीमधून चार ते पाच लाख उत्पन्न मिळाले आहे.