‘वेळप्रसंगी मी साहेबासमोर हात जोडून उभा राहिनं, पण..’ 50 वर्षांपासूनच स्वप्न साकार होताच भाजप आमदाराच्या डोळ्यात आनंदाश्रू VIDEO व्हायरल
काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं. त्यात राजेंद्र राऊत यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. त्यांनी केलेली संघटनात्मक बांधणी आणि विकास कामांमुळे फायदा झाला.

राजकारणात जनतेला नेहमी आश्वासन मिळतात. त्या आश्वासनांची पूर्तता फार कमी वेळा होते. कमी नेते मंडळी असतात, जी एखाद्या कामाचा सतत पाठपुरावा करत राहतात. जनतेचा प्रश्न मार्गी लावणं, नागरिकांची एखाद्या समस्येतून सुटका करणं हा प्रामाणिक हेतू त्यामागे असतो. एखादा अशक्य वाटाणारा मोठा सामाजिक प्रकल्प जेव्हा प्रत्यक्षात येतो, त्यावेळी तो क्षण खूप खास असतो. त्या प्रकल्पासाठी धडपडणारे लोक भावनिक होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सोलापूरचे भाजप आमदार राजेंद्र राऊत यांचा तो व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये राजेंद्र राऊत भावनिक झाल्याचं दिसत आहे. भाजप आमदार राजेंद्र राऊत यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
राजेंद्र राऊत यांची जी ही भावनिक प्रतिक्रिया आहे, त्यातून ग्रामीण महाराष्ट्रात आजही शेती आणि पाणी हे किती महत्वाचे मुद्दे आहेत, ते दिसून येतय. बार्शी उपसा सिंचन योजनेअंतर्गत कोरफळे शिवारात पाणी पूजनावेळी आमदार राजेंद्र राऊत भावूक झाले. शेतकरी बांधवांसमवेत कोरफळे येथे पाणी पूजन करताना राजेंद्र राऊत यांना आनंदाश्रू अनावर झाले. बार्शी तालुक्यात उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आमदार राऊतांनी उजनीतून पाणी आणले. कोरडवाहू असलेल्या बार्शी तालुक्याला पहिल्यांदाच पाणी आल्याने शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळणार आहे. त्यामुळे या कामाच्या जल पूजनावेळी आमदार राऊत यांचं भावनिक होणं स्वाभाविक आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत पाण्यासाठी धडपडणारा कार्यकर्ता
“पाणी आहे तर शेतकरी आहे. माझ्या जीवनात जे प्रेम दिलय तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी त्यांच्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत पाण्यासाठी धडपडणारा कार्यकर्ता आहे. वेळप्रसंगी मी साहेबासमोर हात जोडून उभा राहिनं, पण 80 टक्के तालुका हिरवागार केल्याशिवाय शांत बसणार नाही” असं राजेंद्र राऊत म्हणाले.
अखेर हे स्वप्न साकार झालं
राजेंद्र राऊत हे सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे बडे नेते आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. आता त्यांना भाजपंकडून विधान परिषदेवर संधी मिळाली आहे. तळागाळातील जनतेशी असलेला जनसंर्पक ही त्यांची खासियत आहे. कोरफळे शिवारात शेतीसाठी पाणी आणण्याचं त्यांनी स्वप्न पाहिलेलं. त्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. अखेर हे स्वप्न साकार झालं आहे. त्यामुळे त्यांचे डोळे पाणावले. या पाण्यामुळे कोरफळे गावातील तब्बल 2500 एकर शेतजमीन ओलीताखाली येणार आहे. गेली अनेक वर्षे पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या या भागातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात शेती करता येणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. 50 वर्षांपासून इथले शेतकरी या क्षणाची वाट पाहत होते.