चला बस्स… म्हणणे धनंजय मुंडेंना महागात पडलं, सुनेत्रा पवारांना बोलू न दिल्याने चांगलच सुनावलं
Sunetra Pawar : बीड दौऱ्यावेळी सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी धनंजय मुंडे यांनी या पत्रकार परिषदेत हस्तक्षेप केल्याचे समोर आले होते.

राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांचा बीड दौरा चांगलाच चर्चेत आहे. या दौऱ्यावेळी सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाचे अनेके नेते उपस्थित होते. या वेळी धनंजय मुंडे यांनी या पत्रकार परिषदेत हस्तक्षेप केल्याचे समोर आले होते. सुनेत्रा पवारांच्या पत्रकार परिषदेत मध्ये बोलणं धनंजय मुंडेंना चांगलंच महागात पडलं आहे. यावरून सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंना सुनावलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
काय म्हणाले तटकरे?
बीड दौऱ्यादरम्यान सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप केला होता. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले की, ‘मी ती पत्रकार परिषद पाहिली नाही. मात्र ज्यावेळी पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतात यावेळी जिल्ह्यातील प्रमुख आमदार पालकमंत्र्यांच्या शेजारी बसतात. हे काय चुकीचं नाही. मात्र ती पत्रकार परिषद त्या महत्त्वाच्या व्यक्तीची असते. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच माझ्या मतदारसंघात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मी त्यांच्या बाजूला बसलो होतो, पण मी मध्ये बोललो नाही.
आमचे सहकारी जबाबदारीने वागतील
पुढे बोलताना तटकरे म्हणाले की, धनंजय मुंडे कोणत्या संदर्भाने बोलले, हे मी समजून घेईल. महत्त्वाच्या व्यक्तीच्या पत्रकार परिषदेवेळी बाजूला बसणं हे ठीक आहे, पण बाजूला बसून बोलणं, हे योग्य आहे, असं मला वाटत नाही. आमचे सहकारी यापुढे जबाबदारीने वागतील असं म्हणत तटकरेंनी मुंडेंना सुनावलं आहे.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
या घटनेनंतर धनंजय मुंडे बीडचे हुकूमशहा आहेत का अशी पोस्ट महाराष्ट्र काँग्रेसनं केली होती. यावरून धनंजय मुंडेंनी आपल्याला बदनाम केलं जात असल्याचं म्हणत काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे. मुंडे यांनी म्हटले की, मी इत्तुसा आहे. मी काय आहे. मला का टार्गेट करताय. दीड वर्ष झालं एक शब्द बोललो नाही. माध्यमांवर बोलत नाही. मी मंत्रिपदावर नाही. मी फक्त आमदार आहे. एखाद्याचा द्वेष किती करावा. बीड जिल्ह्यातले ठराविक काहीजण माझा द्वेष करतायत असा आरोपही मुंडे यांनी केला आहे.