ठाकरे बंधुंच्या युतीची चर्चा; पवार कधी एकत्र येणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

ठाकरे बंधुंच्या युतीची चर्चा; पवार कधी एकत्र येणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 19, 2025 | 6:51 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी भांडणं, वाद या क्षुल्लक गोष्टी असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे, उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या या वक्तव्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे भविष्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होऊ शकते अशा चर्चा रंगल्या आहेत. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांची देखील प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यासाठी ही बातमी अतिशय आनंदाची आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?  

राज ठाकरे असं म्हणाले आमच्या वादापेक्षा महाराष्ट्रातील प्रश्न महत्त्वाचे आहेत. माझ्यासाठी ही बातमी अतिशय आनंदाची आहे. माझ्या अंगावर काटा आला. आमचे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाचे गेल्या पाच- सहा दशकांपासून कौटुंबिक संबंध आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही आजही आमच्या कुटुंबासाठी प्रिय आहेत, बाळासाहेब आज हा दिवस बघण्यासाठी असते तर आज आम्हाला खूप आनंद झाला असता. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघे एकत्र येत असतील तर राजकीय आणि कौटुंबीक इतिहासातला हा सोनेरी दिवस आहे. दोन बंधू महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील तर आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया यावर सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता एकत्र येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्नही यावेळी सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. मात्र यावर त्यांनी बोलणं टाळलं. पांडुरंगाची इच्छा आहे, नातेसंबंध माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, आजही आणि उद्याही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं?

राज ठाकरे यांना शिवसेना ठाकरे गटासोबत युतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता, त्याला उत्तर देताना  “या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं, ही काही कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही”  असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.