ईव्हीएमवरून विरोधकांत मोठी फूट ? सुप्रिया सुळेंच्या विधानाने काँग्रेस, ठाकरे गटाला टेन्शन, संसदेत काय म्हणाल्या ?

सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत ईव्हीएमबद्दल मोठे विधान केले आहे. 'मी ईव्हीएमवर प्रश्न विचारणार नाही, कारण याच मशीनमुळे चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहे,' असे त्या म्हणाल्या. महाविकास आघाडी ईव्हीएमला विरोध करत असताना सुप्रिया सुळेंच्या या भूमिकेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यांचे हे विधान निवडणूक सुधारणांवरील चर्चेदरम्यान आले आहे.

ईव्हीएमवरून विरोधकांत मोठी फूट ? सुप्रिया सुळेंच्या विधानाने काँग्रेस, ठाकरे गटाला टेन्शन,  संसदेत काय म्हणाल्या ?
सुप्रिया सुळे
Image Credit source: social media
| Updated on: Dec 16, 2025 | 8:20 AM

ईव्हीएम मशीनवरून विरोधकांनी सातत्याने रान माजवलं आहे. या ईव्हीएम मशीनच्या विरोधात तर महाविकास आघाडीने राज्यात मोर्चाही काढला. त्यात शरद पवार यांची राष्ट्रवादीही सहभागी झाली होती. पण आता त्याच पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya sule) यांचं मोठं विधान आलं आहे. मी ईव्हीएमवर (EVM) सवाल करणार नाही. कारण याच मशिन्समुळे मी चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत हे विधान केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सुप्रिया सुळे या चारवेळा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. त्या शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षाही आहेत. लोकसभेत निवडणूक प्रक्रियेतील सुधारणेवर चर्चा सुरू होती. या चर्चेत सुप्रिया सुळे यांनीही भाग घेतला. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलं. मी याच मशीनमुळे निवडून आले आहे. त्यामुळे मी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मशीनच्या विरोधात बोलत नाही

मी मशीनच्या विरोधात बोलत नाहीये. मी एक अत्यंत मर्यादित गोष्ट मांडत आहे. भाजपकडून मला खूप अपेक्षा आहेत. त्यांना महाराष्ट्रात मोठा जनादेश मिळाला आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. सुप्रिया सुळे या 2006मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यानंतर 2009मध्ये त्या पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेल्या. त्यानंतर मे 2014, मे 2019 आणि जून 2024मध्ये त्या लोकसभेवर जिंकून गेल्या आहेत. 2024मध्ये तर राष्ट्रवादीत फूट पडलेली होती. त्यामुळे बारामतीच्या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या होत्या. म्हणजे नणंद भावजयींमध्ये ही लढत झाली. या लढतीत सुप्रिया सुळे यांचा मोठा विजय झाला होता.

ईव्हीएमला विरोध

इंडिया आघाडीचा ईव्हीएम मशीनला विरोध आहे. बॅलेट पेपरवर मतदान व्हावं अशी त्यांची मागणी आहे. ईव्हीएम मशीन हॅक करून निवडणुका लढवल्या जात आहेत. प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणी करताना दिसणारं मतदान यात मोठी तफावत आढळत असल्याने संशयाला जागा उरत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. त्याविरोधात विरोधकांनी मुंबईत मोठा मोर्चाही काढला होता. तर, जिंकल्यावर ईव्हीएम चांगली आणि हारल्यावर मात्र ईव्हीएम वाईट असा विरोधकांचा सूर असल्याचं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे.