महादेव मुंडेंची हत्या कोणी केली? परळीत जाऊन सुरेश धस थेट बोलले, गंभीर आरोप

मोठी बातमी समोर येत आहे, आज भाजप आमदार सुरेश धस हे परळी दौऱ्यावर आहेत. त्यांनी परळीमध्ये महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. 

महादेव मुंडेंची हत्या कोणी केली? परळीत जाऊन सुरेश धस थेट बोलले, गंभीर आरोप
| Updated on: Feb 22, 2025 | 2:53 PM

मोठी बातमी समोर येत आहे, आज भाजप आमदार सुरेश धस हे परळी दौऱ्यावर आहेत. त्यांनी परळीमध्ये महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.  यावेळी महादेव मुंडे यांचं कुटुंब चांगलंच भावुक झालं. सुरेश धस यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. महादेव मुंडे यांचा मर्डर झाला त्याठिकाणीची गाडी जाते आणि बॉडी जागेवर राहाते. भास्कर केंद्रे, सचिन सानप, गोविंद भताने या पोलिसांची वारंवार या प्रकरणात नावं  येतात, या प्रकरणात पोलिसांचा हात आहे का? असा सवाल यावेळी सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.

नेमकं काय म्हणाले सुरेश धस? 

आकाच्या लोकांनी हा प्लॉट घेतला आहे, नेमका त्यांचा यात हात आहे का? किड्या मुंग्यांसारखी लोक परळीत मारली जातात आणि हे म्हणतात परळीला बदनाम करत आहे. आज पंधरा महिने झाले हत्येचा तपास उलगडत नाही, पोलीस तपासाला आहेत का कशाला?   परळीत या 35 लाख द्या आणि खून करा अशी परिस्थिती आहे. महादेव मुंडे यांचा प्लॉट ज्यांनी घेतला तो प्लॉट नंतर कोणाच्या नावावर झाला हे पाहावे लागेल. या प्रकरणात चार पाच पोलिसांची नावे समोर येत आहेत. भास्कर केंद्रे 15 वर्षे, सचिन सानप हे 10 वर्ष झाले इथेच आहेत. परळीतील पोलिसांनी खून झाल्यावर गाडी नेली पण बॉडी तिथेच ठेवली. याचा अर्थ पोलिसांनीच त्यांना मारले कां?, असा सवाल सुरेश धस यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

100 टक्के यात आकाचा संबंध आहे, किंवा मग पोलिसांनीच याला मारले. रात्री 8 वाजता कोर्टासमोर महादेव मुंडे यांचा खून करण्यात आला. या प्रकरणात आकाच्या आकाचा हात नसेल मात्र आकाचा हात नक्की असेल. असं म्हणत सुरेश धस यांनी पुन्हा एकदा नाव न घेता वाल्मिक कराडवर निशाणा साधला आहे.

दरम्यान परळीमध्ये सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत, आंदोलन करण्यात आलं. सुरेश धस हे परळीला बदनाम करत आहेत, असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला आहे.