
Ranjeet Kasle : निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पुण्यात दाखल झाले आहेत. लवकरच ते पोलिसांना शरण जाणार आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री धनंजय मुंडे, संतोष देशमुख खूप प्रकरणातील प्रमुख आरोप वाल्मिक कराड यांचे नाव घेत गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत. मला वाल्मिक कराडचे एन्काऊंटर करण्यासाठी ऑफर देण्यात आली होती, असा मोठा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर ते संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले होते.
पुण्यात दाखल झाल्यानंतर कासले यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. याववेळी बोलताना “एन्काऊंटरचा आदेश तुम्हाला दिला होता का? असे मला विचारले जात आहे. पण कोणी असा एन्काऊंटरचा आदेश देईल का? या सगळ्या चर्चा बंद दाराआडच्या चर्चा आहेत. मी जे पुरावे मी सादर करतोय, मला त्याबाबत विचारावे. ज्या दिवशी मतदान होतं. त्या दिवशी माझ्या बँक खात्यात दहा लाख रुपये आले,” असा गौप्यस्फोट कासले यांनी केला.
“संत बाळूमामा कंस्ट्रक्शन कंपनी ही वाल्मिक कराडच्या मालकीची आहे. या कंपनीत महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत. त्यांच्या कंपनीतून माझ्या बँक खात्यावर दहा लाख रुपये आले आहेत,” अशीही स्फोटक माहिती कासले यांनी दिली. तसेच यातले साडे सात लाख रुपये मी परत केले आहेत. उर्वरित पैशातून माझा खर्च चालू आहे, असे कासले यांनी सांगितले.
“तेव्हा माझ्या बँक खात्यात 416 रुपये होते. ईव्हीएम मशीनपासून दूर जायचं. ईव्हीएम मशीला छेडछाड होईल ते सहन करायचं. तसेच मी गप्प बसावे म्हणून मला हे दहा लाख रुपये देण्यात आले होते. परळीला माझी ड्यूटी होती. तिथे अपुरं मनुष्यबळ होतं,” अशी अनेक प्रश्न उपस्थित करणारी माहितीही कासले यांनी दिली. धनंजय मुंडे हे चुकीच्या पद्धतीने निवडून आले आहेत, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
माझ्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आली. माननीय एडीजी निखिल गुप्ता यांनी मला सहा तासांच्या आत निलंबित केलं. कारवाईचे पत्र यायला 48 तास लागतात. पण सहा तासांत माझी चौकशी केली आणि मला निलंबित केलं. माझ्या सात वर्षांत एकूण सात बदल्या झाल्या आहेत. दोन वर्षांत माझ्या या बदल्या झाल्या आहेत. मला ज्युनिअर तुकाराम मुंडे करण्यात आलंय, असा दावा कासले यांनी केला. तसेच मी आता पुण्यात पोलिसांना शरण येण्यासाठी आलो आहे. मी शरण जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.