
महाराष्ट्रात सध्या उष्णतेच्या लाटेचा अनुभव राज्यातील जनता घेत आहे. विदर्भात सूर्य आग ओकत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा 46 अंश सेल्सिअसकडे पोचला आहे. ब्रह्मपुरी येथेही उच्चांकी 45.6 अंश तापमान नोंदवले गेले आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे हवामान विभागाने या भागात येलो अलर्ट दिला आहे. तसेच येत्या दोन दिवसांत या भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केल्यामुळे नवीन संकट उभे राहणार आहे.
विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तापमान 42 अंश सेल्सियसच्या वर गेले आहे. वर्धाचे तापमान 44 अंश सेल्सिअस होते. अकोला जिल्ह्यातही तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहचले होते. अमरावतीतही 45 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तसेच विदर्भात पुढील 24 तास उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तापमान वाढत असताना पुढील दोन दिवसांत त्याठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सोलापूर, धुळे, जळगाव, जेऊर, मालेगाव, यवतमाळ आणि भंडारा येथे 43 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला आहे. या ठिकाणी तापमान 43 अंश सेल्सियस दरम्यान आहे.
राज्यात वाढत्या तापमानामुळे मानवी जनजीवनावर परिणाम होताना दिसत आहे. त्वचा रोगाच्या रुग्णांची संख्या वाढली असल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे सनबर्नच्या रुग्ण संकेत वाढ झाली आहे. यामुळे गरज नसेल तर दुपारच्या उन्हात बाहेर जाण्यास टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा 46 अंश सेल्सिअसकडे पोहचला आहे. जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात उन्हाळ्याचा हंगाम पर्यटनाचा समजला जातो. या काळात मोठ्या संख्येत वाघ व वन्यजीव नैसर्गिक अथवा कृत्रिम पाणवट्यावर पाणी पिण्यासाठी येत असतात. या काळात व्याघ्र दर्शन अधिक होत असते. मात्र तापत्या उन्हामुळे व्याघ्रदर्शन करणाऱ्या पर्यटकांना त्रास होऊ नये, यासाठी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने दररोजच्या दुपारच्या सत्रातील सफारीच्या वेळेत बदल केला आहे. आता रोज दुपारी तीन ते सात या वेळेत ही सफारी होणार आहे. हा बदल नियमितपणे एक मे पासून अमलात आणला जात आहे. वाढत्या तापमानामुळे यंदा सुमारे आठ दिवस आधीच हा बदल केला जात आहे.