लसीकरण केंद्रांवर शेकडोंची गर्दी, शहराची लोकसंख्या 20 लाख, दिवसाला फक्त 1200 डोस, भाजपचे रविंद्र चव्हाण आक्रमक

| Updated on: May 10, 2021 | 3:35 PM

कल्याण डोंबिवलीत लसीकरणासाठी नागरीकांचे हाल सुरु आहेत. लसीकरण केंद्रावर शेकडोंची गर्दी असते (Ravindra Chavan slams Maharashtra government over Vaccination).

लसीकरण केंद्रांवर शेकडोंची गर्दी, शहराची लोकसंख्या 20 लाख, दिवसाला फक्त 1200 डोस, भाजपचे रविंद्र चव्हाण आक्रमक
भाजप आमदार रविंद्र चव्हाण
Follow us on

कल्याण (ठाणे) : कल्याण डोंबिवलीत लसीकरणासाठी नागरीकांचे हाल सुरु आहेत. लसीकरण केंद्रावर शेकडोंची गर्दी असते. मात्र लसींचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्रांवर गोंधळाचे वातावरण आहे. यावरुन भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी राज्य सरकारसह ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “एकीकडे राज्य लसीकरणात एक नंबर असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे केंद्राकडून पुरवठा केला जात नाही, असं सांगितलं जातंय. एमएमआर रिजनमध्ये लस उपलब्ध करुन दिली जात नाही. राज्य सरकारचं लसीकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे”, असा आरोप रविंद्र चव्हाण यांनी केला (Ravindra Chavan slams Maharashtra government over Vaccination).

‘लसीसाठी नागरिकांची वणवण’

“राज्यात लसीकरणसंदर्भात सर्वच ठिकाणी बोंब आहे. सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. मात्र लसींचा साठा पुरेसा उपलब्ध होत नाही. नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. 45 पेक्षा जास्त वयाच्या नागरीकांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांचा दुसरा डोस घेण्याची वेळ आली आहे. तरी त्यांना दुसरा डोस मिळत नाही”, असं रविंद्र चव्हाण म्हणाले.

रविंद्र चव्हाण यांचा हल्लाबोल

18 ते 44 वयोगटातील नागरीकांच्या लसीकरणासाठी केवळ कल्याण येथे आर्ट गॅललीत एकच केंद्र आहे. त्याठिकाणी मोठी गर्दी उसळते. इतकेच नाही. कल्याण पूर्वेतील प्रबोधनकार ठाकरे या शाळेत सुद्धा लसीकरणासाठी एकच गर्दी होते. याबाबत भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे (Ravindra Chavan slams Maharashtra government over Vaccination).

‘प्रशासनावर कुणाचाही वचक नाही’

कालच्या तारखेत केवळ 1 हजार 200 लसींचा डोस उपलब्ध झाला होता. महापालिकेची लोकसंख्या 20 लाखांची असताना इतके कमी डोस का उपलब्ध करुन दिले जात आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “याठिकाणी सदस्य मंडळ नसल्याने महापालिकेत प्रशासकाच्या हाती कारभार आहे. त्यावर कोणाचाही वचक नाही. त्यावर कोणाचे नियंत्रण नाही. लसीकरणाचे नियोजन केले गेले पाहिजे. 18 ते 44 वयोगटासाठी अन्य ठिकाणी लसीकरणाची सोय उपलब्ध करुन दिली पाहिजे. तसेच दुसरा डोस घेण्याची वेळ झाली आहे. त्यांच्याकरीता पुरेसे डोस उपलब्ध करुन दिले गेले पाहिजेत”, असं चव्हाण म्हणाले.

हेही वाचा : VIDEO : टोकण घेऊन सहा तास रांगेत, लसीसाठी नंबर आलाच नाही, कल्याणच्या लसीकरण केंद्रावर संतप्त नागरिकांचा राडा