स्वर मला माफ कर… साक्षी मला माफ कर… मी चांगला बाप…; जितेंद्र आव्हाड यांच्या अंगरक्षकाचं शेवटचं स्टेटस काय?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे अंगरक्षक म्हणून कॉन्स्टेबल वैभव कदम यांची नियुक्ती होती.

स्वर मला माफ कर... साक्षी मला माफ कर... मी चांगला बाप...;  जितेंद्र आव्हाड यांच्या अंगरक्षकाचं शेवटचं स्टेटस काय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 29, 2023 | 4:17 PM

निखिल चव्हाण, ठाणे : स्वर मला माफ कर, साक्षी मला माफ कर, मी चांगला नवरा, बाप, मुलगा, भाऊ होऊ शकलो नाही. एका घटनेमुळे माझे आयुष्य वाट लागली.. माझ्या या निर्णयासाठी कुणालाही दोषी धरू नये… हे शब्द जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा तत्कालीन बॉडीगार्ड वैभव कदम (Vaibhav Kadam) यांचे आहेत. वैभव कदम यांचा मृतदेह आज ठाण्यातील एका रेल्वेमार्गावर आढळून आला. जितेंद्र आव्हाड आणि अनंत करमुसे यांच्यातील महाविकास आघाडी काळातील मारहाण प्रकरणात वैभव कदम हे महत्त्वाचे आरोपी आहेत. मात्र मृत्यूपूर्वी वैभव कदम यांनी व्हॉट्सअप स्टेटसला नेमकी हीच विनंती केली आहे. पोलीस आणि मीडियाला विनंती आहे, मी आरोपी नाही… अशा शब्दात त्यांनी व्यथा मांडली आहे.

वैभव कदम यांचं भावनिक स्टेटस

वैभव कदम यांनी मृत्यूच्या आधी स्टेटसला लिहिलेली वाक्य अतिशय भावनिक आणि खळबळजनक आहेत. या सर्व प्रकारात त्यांना अतिशय मनस्ताप होत असल्याचं या वाक्यांवरून दिसून येतंय. यासाठी त्यांनी कुटुंबियांची, जवळच्या माणसांची माफी मागितली आहे. तुमच्या वेदना, दुःख, अश्रू कुणालाही दिसत नाही, मात्र फक्त तुमच्या चुका दिसतात, अशा आशयाचं एक इंग्रजी वाक्यही वैभव कदम यांच्या स्टेटसला दिसून आलं. अखेरीस त्यांनी कुटुंबियांची माफी मागितली आहे..  साक्षी मला माफ कर, स्वर मला माफ कर, आई, पप्पा, मला माफ करा, मी खरच चांगला नवरा, बाप, मुलगा भाव होऊ शकलो नाही, असे शब्द त्यांच्या स्टेटसला दिसून आले.

कदम यांचा मृत्यू संशयास्पद?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे अंगरक्षक म्हणून कॉन्स्टेबल वैभव कदम यांची नियुक्ती होती. अभियंते अनंत करमुसे यांनी आव्हाड यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा राग बाळगत त्यांना मारहाण झाली होती. या मारहाणीत वैभव कदम यांनाही आरोपी करण्यात आलं होतं. मात्र वैभव कदम आता या प्रकरणात माफीचा साक्षीदार व्हायचं ठरवलं होतं, त्यामुळे त्यांचा घातपात झाला असावा का, असा संशय भाजप नेते मोहित कंबोज यांनी व्यक्त केलाय. या प्रकरणी एफआयआर दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.