VIDEO: ठाण्यात आघाडीत बिघाडी, महापौर म्हस्के म्हणतात, मी आघाडीच्या बाजूने नाही; तर आव्हाड म्हणाले…

| Updated on: Jan 16, 2022 | 7:11 PM

कळवा-खारेगाव उड्डाण पुलाच्या श्रेयावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे. थेट वरिष्ठ नेत्यांनीच एकमेकांवर टीकास्त्र सोडल्याने त्याचा ठाण्यातील आघाडीवरही परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे.

VIDEO: ठाण्यात आघाडीत बिघाडी, महापौर म्हस्के म्हणतात, मी आघाडीच्या बाजूने नाही; तर आव्हाड म्हणाले...
jitendra awhad
Follow us on

ठाणे: कळवा-खारेगाव उड्डाण पुलाच्या श्रेयावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे. थेट वरिष्ठ नेत्यांनीच एकमेकांवर टीकास्त्र सोडल्याने त्याचा ठाण्यातील आघाडीवरही परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी आपलं मत आघाडीच्या बाजूने नसल्याचं सांगत थेट एकला चलो रेचा नारा दिला आहे. तर, आघाडी होणारच असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.

महापौर नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन एकला चलो रेचा नारा दिला आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळावे आणि आमची एकहाती सत्ता यावी यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत. युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते घेणार असले तरी महापौर आणि ठाण्याचा जिल्हा प्रमुख म्हणून माझे मत युतीच्या बाजूने नाही, असं म्हस्के यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेचे नगरसेवक सुद्धा आघाडी व्हावी या मताचे नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आघाडीची भाषा आणि टोमणे… जमणार नाही

एकंदरीत जे काही चित्रं निर्माण झालं आहे. त्यावरून मला वाटतं अशा प्रकारे चित्रं निर्माण होणार असेल आणि आरोप प्रत्यारोप होणार असेल तर वैयक्तिक रित्या मी आघाडी करावी या मताचा नाहीये, असं त्यांनी स्पष्ट केलं. एकीककडे आघाडीची भाषा करायची आणि दुसरीकडे टोमणे मारायचे हे आमच्या सारख्या शिवसैनिकाला कधीच पटणारं नाही, असा इशाराही महापौरांनी दिला.

तोंडाला येईल ते बोलू नका

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या सर्व प्रकारावर भाष्य केलं. राष्ट्रवादी पहिल्या दिवसांपासून आघाडीच्या विरोधात बोलली नाही. आघाडी होणार नाही असंही कधी राष्ट्रवादी बोलली नाही. त्यामुळे सत्तेचा गुरुर चांगला नसतो. आपल्याला एकत्रितपणे महाराष्ट्रात वातावरण तयार करायचं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रभावी असं संख्याबळ करायचं असेल तर त्याच्या तयारीला लागावे लागेल. असं तोंडाला येईल ते बोलणं योग्य नाही, असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

आम्ही एवढे कमकुवत नाही

टोमणे कधी दिले जातात. सुरू कधी होतात. आमच्याकडून कधी टोमणे गेले का? आम्ही फक्त त्यांच्या भाष्यावर भाष्य करत असतो. तुम्ही भाष्य करणार आणि समोरचे बोलणार नाहीत असं कधी होणार नाही. तुम्ही भाष्य करणार तर समोरचा उत्तर देणारच. तुम्ही भाष्य करू नका, आम्ही भाष्य करणार नाही. टोल्यास प्रतिटोला हा राजकारणात येतोच. तुम्ही टोला देणार आणि आम्ही शांत बसणार एवढे आम्ही कमकुवत नाही, असं आव्हाड म्हणाले.

आघाडी होणारच

माझं आणि पालकमंत्र्यांचं अनेकवेळा बोलणं झालंय. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका ठाम ठेवूया म्हणून सांगितलं. आघाडी करूया आणि पुढे जाऊया. आपण दोघांनी आघाडी करूया. छोटेमोठे कार्यकर्ते भांडत राहतील. त्याकडे लक्ष देऊ नका. आपण आघाडीच्या बाजूने मत टाकूया आणि आघाडी करून लढूया त्यात आपला फायदा आहे असं मला एकनाथ शिंदे यांनी अनेकदा सांगितलं आहे, असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

VIDEO: बापाची चप्पल मुलाच्या पायात आल्याने अक्कल येत नाही, आनंद परांजपेंचा पलटवार

VIDEO: एसटी डेपोचे भूखंड लाटण्यासाठीच संपावर तोडगा नाही; चंद्रकांत पाटील यांचा आरोप

भारतीय लष्कराला ‘संरक्षण दल’ न म्हणता ‘सशस्त्र सैन्य दल’ म्हणा; निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांचं आवाहन