
कल्याण: संपूर्ण राज्यात दिवाळीची धामधूम सुरू असतानाच कल्याण डोंबिवली महापालिकेतील (kdmc) कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मात्र यंदाची दिवाळी (diwali) कडू जाणार आहे. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीत कुणाकडून कोणतेही गिफ्ट स्वीकारण्यास महापालिका आयुक्तांनी (corporation commissioner) मनाई केली आहे. दिवाळीचं गिफ्ट स्वीकारल्यास कठोर कारवाई करण्याचा आदेशच आयुक्तांनी दिला आहे. केडीएमसीत गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच असं घडत असल्याने पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
कल्याण डोंबिवली पालिकेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी पालिकेत स्वतः किंवा आपले कुटुंबीय, खासगी व्यक्तींच्या माध्यमांमधून दिवाळी भेटीचा स्वीकार करू नये, असे पत्रक आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी मंगळवारी काढले आहे.
त्यामुळे वर्षानुवर्षे दिवाळीच्या काळात आपल्या खासगी वाहनांच्या डिकीत दिवाळी भेटभरून घेऊन जाणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पालिकेच्या 25 वर्षात प्रथमच अशाप्रकारचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
भेट वस्तू कर्मचारी, अधिकाऱ्याने स्वतः, आपले कुटुंबीय किंवा खासगी व्यक्तींमार्फत स्वीकारण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील कलम 12 नुसार कारवाई केली जाईल. तसेच संबंधिता विरुध्द शिस्तभंगाची कारवाई सुरू केली जाईल, असा इशारा आयुक्त दांगडे यांनी दिला आहे.
त्यामुळे दिवाळीत कंत्राटदार आणि इतरांकडून गिफ्ट घेणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. केडीएमसीच्या दर्शनी भागावरच हे पत्रक लावण्यात आलं आहे.
दरम्यान, दिवाळीपूर्वी नागरिकांना चांगले रस्ते व स्वच्छ शहर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनंतर केडीएमसी आता ॲक्शन मोडवर आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खड्डे मुक्त रस्ते, शहरात स्वच्छता राहावी यासाठी महापालिका अधिकारी आता 24 तास ऑन ड्युटी राहणार आहेत. या कामाचा शुभारंभ डोंबिवली पूर्वेकडील ब्राह्मण सभा हॉल परिसरात करण्यात आला.
या कामाची पाहणी माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे व केडीएमसीचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी केली. यावेळी रस्त्यावर सुरू असलेल्या कामावर साईट सुपरवायझर नसल्याने केडीएमसीचे शहर अभियंते अर्जुन अहिरे यांही संताप व्यक्त केला.
तसेच संबंधित अधिकारी व ठेकेदार आणि साईट सुपरवायझर यान्हा फोन करून तुमचं काम फक्त एस्टिमेट ठेवणं इतकचं आहे का? तुम्ही साईट सुपरवायझर आहात. फिल्ड ऑफिसर आहात. फिल्ड ऑफिसर म्हणून तुम्हाला तुमची जबाबदारी कळत नाही का?. ड्रेनेची काय व्यवस्था आहे. रस्त्यावर काय काम केलं पाहिजे. ठेकेदार काम करत नाही एवढेच बोलून फक्त थांबायचं. एक लक्षात ठेवा जेवढे जमत तेवढे काम करत असाल तर पगार पण लिमिटेड घ्या. हे उत्तर अजिबात चालणार नाही, असे खडेबोल सुनावले.