VIDEO: त्रिपुरा घटनेचे थेट भिवंडीत पडसाद, रॅलीनंतर संपूर्ण शहरात कडकडीत बंद

| Updated on: Nov 12, 2021 | 8:33 PM

त्रिपुरातील एका रॅलीत प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल वादग्रस्त विधान करण्यात आल्यानंतर या घटनेचे त्रिपुरात पडसाद उमटले आहेत. भिवंडीत मुस्लिमांनी जोरदार मोर्चा काढून या घटनेचा निषेध नोंदवला.

VIDEO: त्रिपुरा घटनेचे थेट भिवंडीत पडसाद, रॅलीनंतर संपूर्ण शहरात कडकडीत बंद
bhiwandi Muslim protestants
Follow us on

भिवंडी: त्रिपुरातील एका रॅलीत प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल वादग्रस्त विधान करण्यात आल्यानंतर या घटनेचे त्रिपुरात पडसाद उमटले आहेत. भिवंडीत मुस्लिमांनी जोरदार मोर्चा काढून या घटनेचा निषेध नोंदवला. त्यानंतर शहरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली. बंदवेळी काही ठिकाणी दुकानदारांना धमकावण्यात आल्याने वातावरण अधिकच चिघळले. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती निवळली. सध्या भिवंडीत तणावपूर्ण शांतता आहे.

त्रिपुरातील घटनेनंतर भिवंडीतही तणाव निर्माण झाला. मुस्लिम तरुणांनी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध नोंदवला. बघता बघता शेकडो मुस्लिम तरुण एकवटले. त्यानंतर या तरुणांनी मोहल्या मोहल्यातून बाईक रॅली काढून घटनेचा निषेध नोंदवला. ही रॅली सुरू असतानाच शहरातील सर्व दुकाने बंद केली. त्यामुळे शहरात अत्यंत शुकशुकाट पसरला होता. सार्वजनिक आणि खासगी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे अचानक वाहतूक व्यवस्था बंद झाल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली होती. अनेक तरुण रस्त्यावर, गल्लोगल्लीत फिरून दुकाने बंद करताना दिसत होती.

दुकानदारांशी हुज्जत

त्रिपुरातील या घटनेच्या निषेधार्थ रजा अकादमीने बंद पुकारला होता. या बंदला एमआयएम, समाजवादी पार्टी आणि काँग्रेस व राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला होता. मात्र, दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले दिसले नाहीत. भिवंडीत पारनाका येथे आज नमाज नंतर 30 ते 40 दुचाकीवरून आलेल्या युवकांनी दुकाने बंद करण्यासाठी दुकानदारांना धमकावण्याची घटना घडली. शहर पोलीस ठाण्यात धमकविणाऱ्या टोळक्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला असून पोलीस हा व्हिडीओ पाहून कारवाई करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मोठा बंदोबस्त

दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही हिंसक प्रकार घडू नये म्हणून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पोलीस संशयितांची कसून चौकशी करत असून भिवंडीत येणाऱ्यांची तपासणी केली जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

कथित घटनांचे भांडवल करून मोर्चे

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

‘महाराष्ट्र सरकारने मुस्लिम मोर्चे थांबवले नाहीत तर…’, नितेश राणेंचा ठाकरे सरकारला इशारा, फडणवीसांकडून चिंता व्यक्त

Amravati | अमरावतीत मुस्लिम समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण, दुकानांची आणि दुचाकीची तोडफोड

LIVE UPDATE | त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद; मालेगाव, नांदेड, अमरावती, भिवंडीत तणावाचे वातावरण