भिवंडीत घराचा स्लॅब कोसळला, विरारमध्ये मीटर बॉक्समध्ये आग, तर कल्याणमध्ये गांजा जप्त

| Updated on: Sep 18, 2021 | 1:57 PM

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज तीन महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. भिवंडीत घराचा स्लॅब कोसळला. विरारमध्ये सोसायटीच्या मीटर बॉक्समध्ये आग लागली तर कल्याणमध्ये रेल्वेतून गांजा जप्त करण्यात आला आहे. (read crime incidents in thane and palghar district)

भिवंडीत घराचा स्लॅब कोसळला, विरारमध्ये मीटर बॉक्समध्ये आग, तर कल्याणमध्ये गांजा जप्त
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

ठाणे: ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज तीन महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. भिवंडीत घराचा स्लॅब कोसळला. विरारमध्ये सोसायटीच्या मीटर बॉक्समध्ये आग लागली तर कल्याणमध्ये रेल्वेतून गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. (read crime incidents in thane and palghar district)

भिवंडी शहरातील आजमी नगर टिपू सुलतान चौक येथे एक मजली घराचा काही भाग कोसळला. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. स्थानिकांनी तात्काळ धावपळ करत स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सात जणांना सुखरूप बाहेर काढलं. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घटना घडल्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात होता.

विरारमध्ये शॉर्ट सर्किट

विरार पश्चिमेच्या मोरेश्वर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील मीटर बॉक्समध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. आज सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महापालिका अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले. त्यामुळे सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र सोसायटीतील सर्व मीटर जळून खाक झाले आहेत. सध्या इमारतीचा वीज पुरवठा खंडित केला असून शॉर्टसर्किटने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

रेल्वेतून 21 किलो गांजा जप्त

ओडिशाहून मुंबईकडे येणाऱ्या कोणार्क एक्सप्रेसमध्ये जवळपास 21 किलो गांजा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास कल्याण आरपीएफ जवानांनी या ट्रेनमधील बोगी नंबर डी टूच्या सीट नंबर 84 ते 89 या जागेची पाहणी केली. त्यावेळी आरपीएफ जवानांना दोन संशयास्पद बॅगा दिसून आल्या. जवानांनी या दोन बॅगांची तपासणी केली असता त्यात अंमली पदार्थ आढळून आले. हा गांजा नारकोटिक्स विभागाला सुपूर्द करण्यात आला आहे. हा गांजा कोणी आणि कुठून आणला याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी कुणालाही ताब्यात घेण्यात आलं नाही.

दारु न दिल्याने तरुणाची हत्या

दुसरीकडे कल्याणमध्ये देखील हत्येची एक घटना समोर आली आहे. दारु न दिल्याने दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौकात घडली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलिसांनी दोघा आरोपीना गजाआड केलं आहे. सुनील चौधरी, लुटो महलहार अशी या आरोपींची नावे आहेत. या दोघा आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दारु न दिल्याने झालेल्या हत्येच्या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.(read crime incidents in thane and palghar district)

 

संबंधित बातम्या:

ठाण्यात विसर्जनाच्या सातव्या दिवशीही 1686 भाविकांची अँटीजेन चाचणी; एकाचाच रिपोर्ट पॉझिटिव्ह

मोर्चा, आंदोलनामुळे काम करणं अशक्य; पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात मनाई आदेश जारी

एकेकाळचा सख्खा मित्रच ठरला पक्का वैरी, टोळक्याकडून गुंडाची भर रस्त्यात दिवसाढवळ्या हत्या, उल्हासनगरात भयानक थरार

(read crime incidents in thane and palghar district)