Thane Corona: तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज, रुग्ण बरे होण्याचा दर 97 टक्के

| Updated on: Jan 04, 2022 | 9:35 PM

एप्रिल 2021 मध्ये आढळून आलेल्या जिल्ह्यातील एका दिवसाची सर्वोच्च रुग्ण संख्या लक्षात घेऊन त्याच्या तीनपट ऑक्सिजनची उपलब्धता करण्याचे नियोजन सुरु असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

Thane Corona: तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज, रुग्ण बरे होण्याचा दर 97 टक्के
कोरोना
Follow us on

ठाणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात सध्या सुमारे 20 हजार 326 बेडस् उपलब्ध असून त्यापैकी 9044 ऑक्सिजन बेडस् आहेत. एप्रिल 2021 मध्ये आढळून आलेल्या जिल्ह्यातील एका दिवसाची सर्वोच्च रुग्ण संख्या लक्षात घेऊन त्याच्या तीनपट ऑक्सिजनची उपलब्धता करण्याचे नियोजन सुरु असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. नागरिकांनी सावधानता बाळगत कोरोना नियमाच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्ह्यातील उपचारांच्या सुविधांनुसार सीसीसीमध्ये 6825, डिसीएचसीमध्ये 6928, डिसीएचमध्ये 6573 अशा एकूण 20 हजार 326 रुग्णशय्यांची उपलब्धता आहे. त्यामध्ये विलगीकरणासाठी 8490, ऑक्सिजनची सोय असलेल्या 9044, अतिदक्षता विभागातील 2792 रुग्णशय्यांचा समावेश आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर 97 टक्के

3 जानेवारी रोजीच्या अहवालानुसार ठाणे जिल्ह्याचा पॉझिव्हिटी दर हा सुमारे 7.45 टक्के असून रुग्ण बरे होण्याचा दर 97 टक्के एवढा आहे. जिल्ह्यात प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे 8 लाख 91 हजार 487 एवढ्या चाचण्या केल्या जात आहेत. जिल्ह्यात 6 हजार 318 सक्रीय रुग्ण असून त्यापैकी 900 रुग्ण सीसीसीमध्ये, 249 रुग्ण डीसीएचसीमध्ये, 464 रुग्ण डीसीएचमध्ये उपचार घेत असून सुमारे 3 हजार 396 रुग्ण गृह विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. 344 रुग्ण ऑक्सिजनवर असून 26 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

ठाणे जिल्ह्यात 24 एप्रिल 2021 रोजी एकाच दिवशी सर्वाधिक 83 हजार सक्रीय रुग्ण संख्या होती. त्याला 219 मेट्रीक ऑक्सिजनची आवश्यकता होती. आता तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी या संख्येच्या तीनपट म्हणजे 657 मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्धतेसाठी नियोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पीएसए प्लांट, लिक्विड मेडीकल ऑक्सिजन साठविण्यासाठी टाक्या, सिलेंडर्स यांच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.

26 प्लांटच्या माध्यमातून 45 मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती

जिल्ह्यात 31 पीएसए प्लांट प्रस्तावित असून त्यापैकी 26 प्लांटच्या माध्यमातून 45 मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. तसेच सध्या 672 मेट्रीक टन लिक्विड मेडीकल ऑक्सिजनचा साठा करण्याची क्षमता जिल्ह्यात विकसित केली असून अजून 270 मेट्रीक टन साठवणूक क्षमता विकसीत करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.

प्रतिबंधात्मक उपाययोजनोवर देखील भर दिला जातोय

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून उपचारांच्या सुविधेसोबतच प्रतिबंधात्मक उपाययोजनोवर देखील भर दिला जात आहे. लसीकरणाला वेग देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. जिल्ह्यातील ज्या नागरिकांनी अद्याप आपला पहिला अथवा दुसरा डोस घेतला नसेल त्यांनी त्वरीत घ्यावा. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, हात धुणे या कोरोना त्रिसुत्रीचा अवलंब करून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केले आहे. (Thane district administration ready to face the third wave of corona)

इतर बातम्या

Kalicharan Baba: कालीचरण बाबाच्या अडचणीत वाढ; महात्मा गांधी, पंडित नेहरुंविषयी वादग्रस्त विधानाबाबत कल्याणमध्ये गुन्हा दाखल

KDMC Election | केडीएमसी प्रभागांचा आराखडा निवडणूक आयोगाला सादर करणार, यावेळी 11 प्रभागांची भर