Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना पश्चात्ताप, टॅरिफ लावला तरी भारताची निर्यात सुस्साट, आकडेवारी एकदा पाहाच!
अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारताची निर्यात घटेल, अशी शंका व्यक्त केली जात होती. परंतु भारताने टॅरिफचा कोणताही परिणाम न होऊ देता निर्यातीत चांगली कामगिरी केली आहे.

America Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘अमेरिका फर्स्ट’ असे उघड धोरण आहे. मूळच्या अमेरिकन लोकांनाच आमच्या देशात जास्तीत जास्त नोकरी मिळावी आणि अमेरिकेचा व्यापार इतर देशांत चांगला वाढावा यासाठी डोनाल्ड ट्रम्प सातत्याने प्रयत्नशील दिसतात. भारत अमेरिकेत मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. परंतु त्याच प्रमाणात अमेरिका भारतामध्ये निर्यात करत नाही, असा दावा ट्रम्प करतात. हाच व्यापाराचा अनुशेष भरून काढण्यासाठी ट्रम्प यांनी भारताची कोंडी करण्यास सुरुवात केली. याच कोंडीसाठी प्रभावी शस्त्र म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर भारतावर 50 टक्के टॅरिफ लागू करण्यात आला. टॅरिफनंतर भारताच्या निर्यातीवर परिणाम पडेल, असा दावा केला जात होता. परंतु नकारात्मक परिणाम होण्याऐवजी उलट भारताची निर्यात वाढली आहे. याबाबतची ताजी आकडेवारी आता समोर आली आहे.
भारताच्या निर्यातीत कशी प्रगती झाली?
अमेरिकेने टॅरिफ लादलेला असला तरीही भारताने मात्र अमेरिकेसोबतच इतरही देशांत आपली बाजारपेठ शोधली. त्याचाच परिणाम म्हणून भारताच्या निर्यातीत वाढ झाल्याचे दिसून आले. 2026 सालीदेखील अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. 2020 साली भारताची निर्यात साधारण 276.5 अब्ज डॉलर्स होती. 2021 साली ही निर्यात वाढून 395.5 अब्ज डॉलर्सपर्यंत गेली. 2022 साली हे प्रमाण थेट 453.3 अब्ज डॉलर्स एवढे झाले. 2023 साली मात्र भारताची निर्यात 389.5 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली. पुन्हा 2024 साली निर्यातीचे हे प्रमाण 443 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढले. 2025 साली (जानेवारी-नोव्हेंबर) हा आकडा 407 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या माहितीनुसार 2024-25 या आर्थिक वर्षात भारताची वस्तू आणि सेवा निर्णयात ऐतिहासिक उच्च स्तर 825.25 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे.
2026 साल कसे राहणार
चालू वित्त वर्षात (एप्रिल-नोव्हेंबर) निर्यात 562 अब्ज डॉलरपर्यंत गेली आहे. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लागू केला. यामुळे सप्टेंबर, ऑक्टोबर या दोन महिन्यात भारताची निर्यात काही प्रमाणात प्रभावित झाली. मात्र नोव्हेंबर 2025 मध्ये भारताची अमेरिकेसाठीची निर्यात 22.61 टक्क्यांनी वाढून 6.98 अब्ज डॉलरपर्यंत गेले. भारत 2026 सालातही अशीच प्रगती करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
