Thane Police : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 23 जुलैपर्यंत मनाई आदेश जारी; तलवार, भाले, बंदुका वापरण्यास मनाई

| Updated on: Jul 12, 2022 | 1:36 PM

Thane Police : मनाई आदेशाच्या या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Thane Police : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 23 जुलैपर्यंत मनाई आदेश जारी; तलवार, भाले, बंदुका वापरण्यास मनाई
Virar : बेपत्ता मुलांना शोधण्यासाठी पोलिसांची मुस्कान मोहिम, 361 बेपत्ता मुले मुली बेपत्ता
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

ठाणे: शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे पोलीस (Thane Police) आयुक्तालयाने मोठा निर्णय घेतला आहे. ठाणे शहर (Thane City)  विशेष शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी शहरात 23 जुलै 2022 पर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत. या कालावधीत कुणालाही शस्त्र बाळगता येणार नाही किंवा शस्त्र घेऊन कुठेही जाता येणार नाही. तसेच या कालावधीत जाहीरसभा (rally) घेणे, मिरवणुका काढणे आणि घोषणा-प्रतिघोषणा देण्यासही मनाई करण्यात आली आहे. तसेच या कालावधीत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. मनाई आदेश कालावधीत या आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आला आहे. 23 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत हा मनाई आदेश लागू राहणार असल्याचंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

मनाई आदेशाच्या या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, बरोबर नेण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

सभा, मिरवणुकांना मज्जाव

सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे आदींनाही मनाई आदेशाच्या काळात मज्जाव असेल. पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना मनाई आदेश लागू करण्यात आल्याचं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

या गोष्टी वगळल्या

लग्न कार्यासाठी जमलेले लोक. प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका यांना हे आदेश लागू नसेल. सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक. सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय यांनाही या आदेशातून वगळण्यात आले आहे. पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/ मिरवणुका, सर्व शासकीय / निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण, आदींना हे आदेश लागू राहणार नाही, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

तर कारवाई करणार

हा मनाई आदेश 23 जुलै 2022 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 135 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे ठाणे विशेष शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. पठारे यांनी कळविले आहे.