माणुसकी मेली, निगरगट्ट कर्मचाऱ्यांना पाझर न फुटल्याने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच महिलेची प्रसुती

| Updated on: Sep 09, 2023 | 9:57 PM

महिलांबाबत नेहमी खूप घोषणाबाजी केली जाते. महिलांसाठी अमूक सुविधा सुरु केली, तमूक सुविधा सुरु केली, असा नेहमीच गाजावाजा केला जातो. पण हे स्थानिक पातळीवर कितपत खरं आहे? हे पडताळून पाहण्याची आज जास्त आवश्यकता आहे. कारण कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलीय.

माणुसकी मेली, निगरगट्ट कर्मचाऱ्यांना पाझर न फुटल्याने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच महिलेची प्रसुती
Follow us on

कल्याण | 9 सप्टेंबर 2023 : कल्याण शहराचं नाव दिवसेंदिवस प्रचंड बदनाम होत चाललं आहे. या शहरात सातत्याने गुन्हेगारीच्या अतिशय वाईट घटना समोर येत आहेत. प्रत्येक घटना ही गेल्या घटनेपेक्षा जास्त वाईट आणि टोक गाठताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य कल्याणकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आरोपी नराधमांना पोलिसांचं देखील भय राहिलेलं नाही. अशी परिस्थिती असताना आता कल्याणमध्ये माणुसकीदेखील जीवंत आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण इतकी हृदयद्रावक आणि मन हेलावणारी घटना एका शासकीय रुग्णालयातून समोर आलीय.

कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील अतिशय संतापजनक आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याणमधील स्काय वॉकवर गरोदर महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. तिला होणारा त्रास पाहून काही नागरिकांनी आणि पोलिसांनी या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात आणले. संबंधितांनी या महिलेला कल्याणच्या रुक्मिणीबाई या शासकीय रुग्णालयात आणलं. पण इथल्या रुग्णालय प्रशासनाने महिलेला दाखल करुन घेण्यास स्पष्ट नकार दिला.

पोलिसांनी विनवणी केली, तरीही…

नागरिकांनी रुग्णालय प्रशासनाकडे महिलेला दाखल करुन घेण्याची विनंती केली. पण रुग्णालयाने तिला प्रसूतीसाठी दाखल करून घेण्यास नकार दिला. रुग्णालय प्रशासनाने आमच्याकडे स्टाफ नाही असे उत्तर देत महिलेकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे पोलिसांनी देखील प्रचंड विनवण्या केल्या. पण स्टाफ इतका निगरगट्ट होता की, त्यांनी पोलिसांच्या विनंतीकडेदेखील दुर्लक्ष केलं.

संतापजनक प्रकार

अखेर या महिलेची प्रसुती रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच झाली. संबंधित प्रकारामुळे नागरिकांमध्ये रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात रोष निर्माण झालाय. कल्याणच्या शासकीय रुग्णालयात खूप लांबून, विविध तालुक्यांमधील रुग्ण उपचारासाठी येत असतात. असं असाताना रुग्णालयात पुरेसा स्टाफ नाही, असं उत्तर तरी कसं दिलं जावू शकतं? शासनाकडून या रुग्णालयात पुरेसा स्टाफ खरंच ठेवला जात नाही का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.