
ठाणे : कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीत तिसगांव परिसरात शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटने एक जण जखमी झालाय. ऋतिक कुरकुटे असे शॉक लागून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण कसाऱ्याहून कल्याणमध्ये नालेसफाई करण्यासाठी आला होता. तो सकाळी 7 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत नालेसाफ करून नाल्याच्या बाहेर पडताना त्याच्यासोबत अनपेक्षितल प्रकार घडला. ऋतिक नालेसफाई करुन नाल्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी गेटच्या साहाय्याने बाहेर पडत होता. यावेळी त्याला विजेचा शॉक लागला. त्याच्या जोडीला काम करणारा त्याचा मित्र अविनाश याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो विजेच्या झटक्याने फेकला गेला.
अविनाशने बांबूच्या साहाय्याने ऋतिकचा प्राण वाचवायचा प्रयत्न केला. मात्र ऋतिक कुरकुटे याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या ठिकाणी विद्यूत पुरवठा करणाऱ्या मोठी डीपीचे झाकण उघडे असल्याने त्यातून एखाद्या वायरीचा विद्यूत पुरवठा त्या लोखंडी गेटला लागण्याची शंका व्यक्त केली जात आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याप्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे.
कल्याणमध्ये पाऊस आणि वाऱ्यामुळे अनपेक्षित घटना घडू लागल्या आहेत. विशेष म्हणजे या घटानांमुळे सर्वसामान्य नागरिकांनादेखील नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. कल्याणमध्ये गेल्या आठवड्यातच मलंगगड रोडवर राधा कृष्णा पार्क समोर विजेचा खांब कलला. त्यामुळे तब्बल आठ तास शहरातील अनेक भागांमध्ये गुल झाली.
विशेष म्हणजे ही घटना ताजी असतानाच गुरुवारी अनमोल गार्डन बस स्टॉप जवळ विजेचा खांब हा थेट खाली कोसळला. सुदैवाने हा खांब जमिनीवर कोसळला नाही तर बाजूला असलेल्या एका टपरीवर पडला. सुदैवाने हा विजेचा खांब कुणाच्या अंगावर पडला नाही. अन्यथा नको तो अनर्थ घडला असता. या घटनेमुळे सुद्धा संबंधित परिसरात दिवसभर विजेचा खोळंबा झाला. एकीकडे उकाड्याने नागरीक हैराण झाले आहेत. दुसरीकडे अशाप्रकारे विजेचा खोळंबा होत असल्याने नागरीकही हैराण झाले आहेत.