रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्याची मुदत संपली, नाही बोलणार मराठी.., मग आज समजेल काय होतं ते?
रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेची सक्ती करण्यात आली आहे, त्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत त्यांना मराठी भाषा बोलण्याचं प्रशिक्षण देखील देण्यात आलं होतं. मात्र आता ही मुदत संपली आहे, आजपासून कारवाईला सुरुवात होणार आहे.

राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालक यांना मराठी भाषा बोलणं सक्तीचं करण्यात आलं होतं. त्यावरून मोठा वाद देखील निर्माण झाला होता. ज्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकांना मराठी बोलता येणार नाही, त्यांचे परवाने निलंबित होणार असल्याचं परिवहन मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यावरून मोठा वाद देखील निर्माण झाला होता. सरकारने अचानक घेतलेल्या या निर्णयाला रिक्ष, टॅक्सी चालकांकडून विरोध करण्यात आला होता. त्यानंतर सरकारने रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकता यावी यासाठी मराठी भाषेचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले. ज्यांना मराठी येत नाही, अशा रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी सरकारच्या वतीने 15 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती.
मात्र आता ही मुदत संपली आहे, त्यामुळे आजपासून प्रादेशिक परिवहन विभागाकडून नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. अमराठी चालकांना व्यावहारिक मराठी भाषा येत नसल्याने, अनेकदा वाद झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काही रिक्षा, टॅक्सी चालकांना मारहाण करण्यात आल्याच्या घटनाही घडल्या होत्या. त्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमराठी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याची सूचना केली होती. चालकांना प्रवाशांशी मराठीतून संवाद साधता यावा, यासाठी ‘मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’ राबविण्यात आले, त्याअंतर्गत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांना 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु आता ज्या चालकांना मराठी भाषा येत नाही, त्यांच्यावर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
दरम्यान दुसरीकडे ‘मराठी न बोलणाऱ्या उत्तर भारतीय रिक्षाचालकांचे परमिट रद्द केले जाईल’ अशा शब्दात स्पष्ट इशारा परिवहान मंत्री प्रताप सरनाईक यांनी उत्तर भारतीय रिक्षा, आणि टॅक्सी चालकांना दिला आहे. यावर आता या इशाऱ्याला उत्तर भारतीय विकास सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पंडित संजय दुबे यांनी थेट आव्हानच दिले आहे. मी रिक्षा चालवणार, पैसेही कमावणार पण मराठी बोलणार नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र आजपासून आता मराठी न येणाऱ्या रिक्षा चालकांविरोधाक कडक कारवाईला सुरुवात होणार आहे. तरीही रिक्षा, टॅक्सी चालक मराठी बोलणार नाहीत का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टॅक्सी चालकांची प्रतिक्रिया
या निर्णयाचे काही टॅक्सी चालकांकडून स्वागत करण्यात आलं आहे, तर काही टॅक्सी चालकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही गेल्या 30 वर्षांपासून मुंबईत टॅक्सी चालवतो आम्ही आता मराठी शिकण्याचा प्रयत्न करतोय, पण परवाना रद्द करण्याची कारवाई नको अशी मागणी टॅक्सी चालकांनी केली आहे. तर आम्ही वडाळा कार्यालयात शिकायला गेलो तर तिथं व्यवस्थित शिकवलं जात नाही, लवकर शिकवत नाहीत अशा अनेक तक्रारी टॅक्सी चालकांनी यावेळी केल्या आहेत.