पोहायला गेले ते परतलेच नाहीत, 3 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू; छत्रपती संभाजीनगरवर शोककळा
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या देवळाई तांडा परिसरातील साई टेकडी येथील तलावात शनिवारी सायंकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पोहण्यासाठी गेलेल्या पाच मुलांपैकी तीन अल्पवयीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. शहरालगतच्या देवळाई तांडा परिसरातील साई टेकडी येथील तलावात शनिवारी सायंकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पोहण्यासाठी गेलेल्या पाच मुलांपैकी तीन अल्पवयीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला, तर दोन मुलांना सुदैवाने जीवदान मिळाले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
तिघांचा बुडून मृत्यू
समोर आलेल्या माहितीनुसार, देवळाई तांडा येथील साई टेकडी तलावात पाच मुले पोहण्यासाठी गेली होती. पोहत असताना अचानक त्यांचा तोल गेल्याने सर्व मुले अडचणीत सापडली. यापैकी दोन मुलांनी कसाबसा जीव वाचवला, मात्र तीन मुले खोल पाण्यात बुडाली. घटनेची माहिती नगरसेवक मोहित त्रिवेदी यांनी अग्निशमन नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर तात्काळ पद्मपुरा मुख्य अग्निशमन केंद्र व कांचनवाडी अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी रवाना झाले आणि मदतकार्य सुरू केले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तलावात शोधमोहीम राबवून बुडालेल्या तिन्ही मुलांना बाहेर काढले. त्यानंतर मुलांचे मृतदेह चिकलठाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. विशाल मच्छिंद्र घुले (वय 15 वर्षे), आदर्श गौतम इंगोले (वय 15 वर्षे), यश ज्ञानेश्वर बरंबाईल (वय 16 वर्षे) अशी मृत मुलांची नावे आहेत. हे तिघेही सातारा परिसरातील लक्ष्मी कॉलनी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
भंडाऱ्याच्या खोडगाव येथे सूर नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खोडगाव येथे देवदर्शनासाठी कुटुंबासह आलेल्या एका तरुणाचा सूर नदीच्या खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शलाब मोहन कडव (वय 32, रा. शिवनगरी, भंडारा) असे मृत तरुणाचे नाव आहे. धार्मिक कार्यक्रमानिमित्त खोडगाव येथे आलेल्या कडव कुटुंबातील शलाब हा दर्शनानंतर अंघोळीसाठी नदीपात्रात उतरला होता. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो प्रवाहात ओढला गेला.
यानंतर शलाबचा भाऊ विक्रमने मदतीसाठी आरडाओरड केली, परंतु जोरदार प्रवाहामुळे त्याला वाचवता आले नाही. वरठी पोलिसांच्या सुमारे तीन तासांच्या शोधमोहिमेनंतर त्याचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.