खेळताना अंघोळीची इच्छा झाली, अंगाची लाहीलाही थांबवण्यासाठी डबक्यात उतरले अन् तेवढ्यात… 3 चिमुरड्यांसोबत काय घडलं?

अक्कलकुवा तालुक्यातील जामठी परिसरात अंघोळीसाठी गेलेल्या तीन आदिवासी बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

खेळताना अंघोळीची इच्छा झाली, अंगाची लाहीलाही थांबवण्यासाठी डबक्यात उतरले अन् तेवढ्यात...  3 चिमुरड्यांसोबत काय घडलं?
फोटो प्रातिनिधक
| Updated on: Jun 10, 2026 | 8:32 AM

नंदुरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम जामठी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नदीकाठावरील पाण्याने भरलेल्या डबक्यात अंघोळीसाठी गेलेल्या तीन निष्पाप आदिवासी बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण जामठी परिसरासह अक्कलकुवा तालुक्यावर शोककळा पसरली असून, आदिवासी बांधवांमधून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, जामठी परिसरातील ही तीन लहान मुले दुपारी नदीकाठच्या परिसरात गेली होती. या ठिकाणी नदीजवळच पाण्याने भरलेले एक मोठे डबके होते. कडक उन्हाळा असल्याने आधीच अंगाची लाहीलाही होत होती. त्यामुळे अंघोळीचा आनंद घेण्यासाठी ही तिन्ही मुले त्या डबक्यात उतरली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ही तिन्ही निष्पाप बालके पाण्यात बुडू लागली. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघांचाही पाण्यात बुडून अंत झाला.

ग्रामस्थांची धाव, पण वेळ निघून गेली होती

मुले बऱ्याच वेळापासून घरी न परतल्याने स्थानिक नागरिकांनी नदीकाठाकडे धाव घेतली. यावेळी डबक्याजवळ मुलांचे कपडे व इतर साहित्य पाहून ग्रामस्थांनी तातडीने पाण्यात शोधमोहीम सुरू केली. मोठ्या प्रयत्नांनंतर तिन्ही बालकांना पाण्याबाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच मृत बालकांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सुरक्षा उपाययोजनांचा अभाव; प्रशासनावर प्रश्नचिन्ह

या भीषण दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाविरोधी नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. नदीकाठच्या अशा धोकादायक डबक्यांवर किंवा उत्खनन झालेल्या ठिकाणी कोणत्याही सुरक्षा उपाययोजना किंवा धोक्याचे फलक लावण्यात आले नव्हते. प्रशासनाच्या आणि संबंधित कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळेच तीन निष्पाप बालकांचे बळी गेले आहेत, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

मदत आणि सुरक्षेची मागणी

या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण आदिवासी समाजात तीव्र दुःख व्यक्त होत आहे. पीडित कुटुंबे अत्यंत गरीब आणि दुर्गम भागातील असल्याने शासनाने त्यांना तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने परिसरातील धोकादायक पाण्याचे साठे, डबके बुजवावेत किंवा त्याभोवती तात्पुरती तटबंदी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us