अंत्यविधीसाठी निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, जगबुडी नदीत कार कोसळून 5 मृत्यूमुखी

नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी गावाला निघालेल्या मीरा-रोडला राहणाऱ्या कुटुंबातील 5 जणांचा कार अपघातात मृत्यू झाला. जगबुडीच्या पात्रात कार कोसळून तिचा चेंदामेंदा झाला होता.

अंत्यविधीसाठी निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, जगबुडी नदीत कार कोसळून 5 मृत्यूमुखी
जगबुडी नदीत कार कोसळून 5 ठार
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 19, 2025 | 11:29 AM

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला असून खेडमधील जगबुडी नदीपात्रात कार कोसळून 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मिरा रोड येथून देवरूखच्या दिशेने निघालेल्या कुटुंबियांचा या घटनेत दुर्दैवी अंत झाला. धक्कादायक आणि तेवढीच दु:खद गोष्ट म्हणजे, अपघातग्रस्त कारमधील नागरिक हे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठीच देवरूखला जात होते. मात्र त्यांनाही वाटेत मृत्यूने गाठले. जगबुडी नदीच्या (Jagbudi River) पुलावरुन कार थेट 100 फूट खाली कोसळली. या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला तर कारचा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. नदीपात्रात मोटार कोसळल्याची माहिती मिळताच अनेकांनी जगबुडी नदी पुलाकडे धाव घेतली. या भीषण अपघातात कुटुंबातील 5 जणांनी जीव गमावल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी – मुंबई गोवा महामार्गावर खेडजवळ सोमवारी (19 मे) पहाटे हा भयानक अपघात झाला. पोलिसांच्या सांगण्यानुसार, अपघातातील मृत हे मिरा रोडचे रहिवासी असून ते अंत्यविधींसाठी देवरूखच्या दिशेने जात होते. मात्र कारचा वेग जास्त असल्यानेच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ही कार थेट जगबुडी नदीच्या पात्रात 100 ते 150 फूटखाली कोसळली. हाँ अपघाता एवढा भीषण होता की कारचा अक्षरश: चेंदामेदा झाला होता.

अत्यंविधींसाठी जातानाच मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेधा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर (22), मिताली विवेक मोरे (45) , निहार विवेक मोरे (19), श्रेयस राजेंद्र सावंत (23) अशी मृतांची नावं असून त्यामध्ये दोन कुटुंबातील व्यक्तींचा समावेश आहे.

दोन्ही कुटुंबे मुंबईतील मीरारोड येथील रहिवासी असून ते रात्री 11.30च्या सुमारास देवरूख येथे जात होते. मात्र गाडीच वेग प्रचंड होता. त्यांच कार भरणे नाका येथे आल्यावर नियंत्रण सुटलं आणि कार जगबुडी नदीवरील असलेल्या मोठ्या पुलावरून थेट नदीत कोसळली. ही भीषण दुर्दैवी घटना पहाटे पाच ते साडेपाच सुमारास घडली.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि बचावकार्य तातडीने सुरू केले. ही कार क्रेनच्या साहाय्याने वर उचलण्यात आली. कारमधील लोकांना बाहेर काढण्यात आले, पण त्यांना वाचवण्यात अपयश आलं. पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी खेड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. कारचा चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.