Tukaram Mundhe: सण-उत्सव साजरे करा, पण…; FDAच्या आदेशाचा नेमका अर्थ तुकाराम मुंढेंनी सांगितला

Tukaram Mundhe: एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे की अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी जारी केलेल्या सूचनांचा उद्देश सणांवर निर्बंध घालण्याचा नाही. याविषयी ते काय म्हणाले, ते सविस्तर जाणून घ्या..

Tukaram Mundhe: सण-उत्सव साजरे करा, पण...; FDAच्या आदेशाचा नेमका अर्थ तुकाराम मुंढेंनी सांगितला
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 07, 2026 | 9:30 AM

महाराष्ट्रात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) जारी केलेल्या नव्या निर्देशांबाबत गैरसमज निर्माण झाल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. एफडीएचा आदेश उत्सवांवर निर्बंध घालण्यासाठी नसून उत्सवांमध्ये आणि मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वितरित होणारं अन्न सुरक्षित राहावं, यासाठी असल्याचं मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे. सण-उत्सव, लग्नसमारंभ, भंडारे, ईद, ख्रिसमस, नववर्षाचे कार्यक्रम किंवा इतर सार्वजनिक मेळावे याठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नाचं वितरण केलं जातं. अशा वेळी नागरिकांना सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्न मिळणे हा FDAचा मुख्य उद्देश आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

“आम्ही उत्सवांचं नियमन करत नाही, तर उत्सवांमध्ये दिलं जाणारं अन्न सुरक्षित आहे की नाही, याची खात्री करत आहोत,” अशी भूमिका मुंढेंनी मांडली. अन्नभेसळीला आळा घालण्यासाठी एफडीएने वर्षभरासाठी ‘फेस्टिव्हल एनफोर्समेंट कॅलेंडर’ तयार केला आहे. याअंतर्गत विविध सण, जत्रा आणि धार्मिक कार्यक्रमांच्या काळात अन्नपदार्थांची नियोजनबद्ध तपासणी केली जाणार आहे. यापूर्वी एखादा सण जवळ आला की त्यासाठी स्वतंत्रपणे सूचना दिल्या जात होत्या. आता वर्षभरासाठी एकसमान व्यवस्था तयार करण्यात आली आहे.

या मोहिमेत दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, खाद्यतेल, मांस, फळे, सुका मेवा, उपवासाचे पदार्थ, पाणी आणि बर्फ, बेकरी उत्पादनं यांसारख्या जोखमीच्या खाद्यपदार्थांवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे. भेसळ आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. यावेळी तुकाराम मुंढे यांनी आणखी एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली आहे. अन्न व्यवसायासाठी नोंदणी आणि परवान्याशी संबंधित कायदेशीर चौकट 2011 पासून अस्तित्वात आहे. नव्या आदेशामुळे कोणताही नवीन कायदा, स्वतंत्र परवाना व्यवस्था किंवा उत्सवांसाठी अतिरिक्त कायदेशीर निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत, असं त्यांनी सांगितलं.

त्यामुळे धार्मिक किंवा सांस्कृतिक परंपरांमध्ये हस्तक्षेप करण्याचा एफडीएचा कोणताही हेतू नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. उत्सव साजरे करण्यास निर्बंध नसून, त्या काळात नागरिकांना मिळणारं अन्न सुरक्षित आणि भेसळमुक्त असावं, एवढाच या मोहिमेचा उद्देश आहे, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us