
मुंबई, पुण्यासह राज्यभरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. रात्रभर झालेल्या पावसानंतर सोमवारी सकाळी मुंबई, पुण्यात जोरदार पाऊस सुरू झाला. पुणे शहरासह जिल्ह्यात हवामान विभागाकडून आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. राज्यातील शाळा आजपासून सुरु होणार आहे. शाळेच्या पहिला दिवशी विद्यार्थ्यांकडे नवीन गणवेश, दप्तर व पुस्तके असणार आहेत. मावळमधील कुंडमळा येथील पूल कोसळून रविवारी मोठी दुर्घटना घडली. त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन काल रात्री 10 वाजता थांबविण्यात आले होते. सोमवारी सकाळी 7 वाजता पुन्हा रेस्क्यू सुरु करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी) आणि संत तुकाराम महाराज (देहू) यांच्या पालख्यांचे 19 जून रोजी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन यासह सर्व क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
वाशिंद आणि आसनगाव दरम्यान मालगाडीत तांत्रिक बिघाडामुळे कसाराकडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल ट्रेन सह पंचवटी एक्सप्रेस देखील या मालगाडीमुळे अर्धा तास थांबून ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आता मालगाडी आसनगाव स्टेशनपर्यंत नेण्यात आली असून, मध्य रेल्वे मार्गावरील गाड्या वीस मिनिट उशिरानं धावत आहेत.
कल्याण, डोंबिवलीमध्ये आज सकाळपासूनच पाऊस सुरू आहे, पावसामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाल्याचं पाहायला मिळालं. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी धावपळ उडाली. सतत सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील काही ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.
पुणे : आज कोकण,गोवा आणि घाटमाथ्यावर हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आलाय तर उद्या कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. कोकणात अतिवृष्टीसह मुसळधार पाऊस होण्याची श.आहे
विशेषतः पुण्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे. पर्यटकांनी सावधानी बाळगणं गरजेचं आहे. येणाऱ्या तीन ते पाच दिवस असाच पाऊस बरसत राहणार असल्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आता पेरणी करून घेण्यास हरकत नाही असा अंदाज पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस.डी. सानप यांनी सांगितलं आहे.
मुंबई उपनगरातील अंधेरी पवई परिसरात पाऊस सुरू झाला
सकाळपासून रिमझिम पाऊस पडत होता. पण आता मुसळधार पाऊस पडत आहे.
जर असाच मुसळधार पाऊस पडत राहिला तर लवकरच अंधारी भुयारी मार्ग तसेच खालचा भाग पाण्याखाली जाऊ शकतो.
पवई परिसरात रस्त्यावर अंधार आहे आणि मुसळधार पाऊस पडत आहे.
खड्ड्यांमुळे गाडी स्लिप होऊन लहान बाळासह पडले
अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद
उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे टेम्पोने 2 शाळकरी मुलींना चिरडल्याची घटना घडली आहे.
कणकवली – आचरा राज्य मार्गावरील पावसाने पाणी आल्याने सकाळपासून वाहतूक बंद झाली. तब्बल आठ तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे.
ठाण्यातील बाळकुम येथे दोस्ती युरो स्कूलमध्ये मराठी भाषेला तिसरी भाषा म्हटल्याने मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आंदोलन केले आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबई -गोवा महामार्गवरील कळंबनी येथे रस्ता खचला आहे. खबरदारी म्हणून स्थानिकांनी महामार्गावर झाडाच्या फांद्या टाकल्या आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूम रस्त्याला तडे गेले आहेत. वाहन चालवताना सर्वांनाच काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
रत्नागिरीत सर्वाधिक 112 मिमी पावसाची नोंद, तर सिंधुदुर्गात 110 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. येत्या 24 तासात रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुणे घाट,सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत सुद्धा 100 मिमी पावसाची नोंद, तर मुंबई उपनगरात 86 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
मुंबई,पुण्यात मुसळधार पाऊस आहे. लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला असून 100 टक्के भरला आहे. लोणावळ्यात गेल्या 24 तासात 143 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पर्यटकांनी भुशी डॅमवर जाणे टाळावं असं आवाहान करण्यात आलं आहे.
वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावरून नाशिकमध्ये लोकप्रतिनिधी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आज फरांदे वाहतूक कोंडी विरोधात लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले.
शाखाध्यक्ष, विभागाध्यक्ष काम करत नाहीत तिथे त्वरित पर्याय शोधा – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे आदेश. मनसेच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिलेत.
30 जूनपर्यंत संबंधित पर्यायासह अहवाल सादर करण्यात सांगण्यात आलं आहे.
ठाण्यातील वंदना एसटी डेपो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सखोल भागात पाणी साचलं आहे. गुडघाभर पाणी साचल्यामुळे अनेक वाहनं बंद पडत आहेत.
अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये विमानाचा पायलट सुमित सभरवाल याचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांच्या मुंबईतील घरी आणि सोसायटीमध्ये सध्या दुःखाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार डीएनए चाचणीचा अहवाल आल्यानंतर सुमित सभरवाल यांचे पार्थिव त्यांच्या घरी आणले जाईल. त्यानंतर पवई येथे त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसुनेने, जयश्री पाटील यांनी भाजपात केला प्रवेश.भाजपाचे ज्येष्ठ नेते व उच्चतंत्र शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश.
अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा मृत्यू झाला होता. डीएनए चाचणीनंतर आज त्यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.
एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलायनर या विमानाने हाँगकाँगवरुन दिल्लीला जाण्यासाठी उड्डाण केलं होतं. तांत्रिक बिघाड लक्षात येताच वैमानिकाने माघारी परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हाँगकाँग एअरपोर्टवर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. हा तांत्रिक बिघाड काय आहे? ते अजून स्पष्ट झालेलं नाही.
हाँगकाँगवरून दिल्लीला येणारं एअर इंडियाचं बोईंग 787-8 विमान पुन्हा हाँगकाँगला रवाना झालं आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
“या घटनेमध्ये बेपत्ता लोकांचं शोधकार्य सुरू आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री हे आपल्या जिल्ह्याचेच आहेत. ते तिथे पोहोचलेले आहेत. त्यामुळे तपासकार्याला वेग येईल आणि काम होईल,” अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत दिली.
पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करुळ घाटामध्ये दरड कोसळली आहे. करूळ घाटामध्ये मातीचा मलबा आणि दरड रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सिंधुदुर्गातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सध्या करूळ घाटातून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हजर राहणार आहेत. थोड्याच वेळात विजय रूपानी यांचा मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द केला जाणार आहे. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये विजय रुपानीसुद्धा होते. विमान अपघातात त्यांनी आपले प्राण गमावले आहेत.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील पिंपळगाव गरुडेश्वर भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पावसाच्या पाण्याने शेती पिक वाहून गेली आहे, तर काही भागातील शेत जमिनीतील माती देखील वाहून गेली आहे.
वसई-विरार शहरात मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, ज्यामुळे शहरातील सखल भागांतील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. विरार पश्चिमेकडील जैन मार्गावर तब्बल दोन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. याचा थेट परिणाम वाहतुकीवर झाला. कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना साचलेल्या पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे, तर अनेक वाहने रस्त्यातच बंद पडल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या गंभीर परिस्थितीत वसई-विरार महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग मात्र कुठेच दिसत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघर दौऱ्यावर आहेत. ते दुर्वेस येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला भेट देणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री विद्यार्थ्यांचे स्वागत करतील आणि त्यांना पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वाटप करतील. यावेळी ते पालकांशीही संवाद साधणार आहेत. पालघरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे काही प्रमाणात गैरसोय झाली असली तरी, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळेल, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने अधूनमधून जोर धरला आहे. कणकवली-आचरा राज्य मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. जाणवली संगम नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, यामुळे सुमारे १५ ते २० गावांचा संपर्क तुटला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरून राजकीय नाट्य सुरू आहे. आमदार सीमा हिरे यांचा या प्रवेशाला असलेला विरोध कायम आहे. त्यांनी यासंदर्भात व्हॉट्सॲप स्टेटस आणि सोशल मीडियावर पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, माध्यमांसमोर यावर स्पष्ट भूमिका मांडण्यास त्यांनी नकार दिला आहे. सुधाकर बडगुजर यांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची चर्चा असताना, आमदार हिरे यांनी ‘सोशल मीडियावर पक्षप्रवेशाचा विरोध मावळलेला नाही’ असा मजकूर टाकून आपला विरोध दर्शवला आहे.
चंद्रपूरमधून 12 लाखांचं चोर बीटी बियाणं जप्त करण्यात आली आहेत. चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. बल्लारपूर मार्गावरील विसापूर ईथे ही करण्यात कारवाई आली. टाटा एस गाडीतून कपाशीचं हे चोर बीटी बियाणं गडचिरोली जिल्ह्यात नेत असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार चारचाकी वाहनाची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये प्रतिबंधित असलेल्या बीटी पुष्पा या कपाशीच्या वाणाची 800 पाकीटं जप्त करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. दौंड-पुणे डेमू ट्रेनमध्ये आग लागली आहे. डेमू ट्रेन पुण्याला येताना शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीच्या वेळी टॉयलेटमध्ये अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं आहे.
अमरावती जिल्ह्यात अनेक भागांमध्ये कपाशी लागवडीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात यावर्षी 7 लाख हेक्टरवर हंगामाची पेरणी प्रस्तावित आहे. यावर्षी सर्वाधिक 2 लाख 65 हजार हेक्टर वर सोयाबीनची पेरणी होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 2 लाख 55 हजार हेक्टर वर होणार कपाशीची लागवड होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कपाशी लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे.
भारतीय हवामान खात्याकडून मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 3 तासांसाठी (सकाळी 8 पासून) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.
मुंबईत आज सकाळपासून दमदार पावसाने हजेरी लावली. वांद्रे, कुर्ला, अंधेरी, बोरीवली, दादर, कुलाबा परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. हवामान विभागाने सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सिग्नल यंत्रणा आणि तांत्रिक कारणामुळे मुंबई लोकल ट्रेन उशिराने धावत आहे. कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाणाऱ्या लोकलचे दहा ते बारा मिनिटे उशिराने सुरू आहे.
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळच्या वणी येथील जयस्वाल कुटुंबातील तिघांचा मृत्यू रविवारी झाला होता. त्यांचे मृतदेह आज गावी आणण्यात येणार आहे. राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल, दोन वर्षांची काशी अशी मृतांची नावे आहे.
पुण्यातील तीन तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे रस्त्यावरील सखल भागात पाणी साचले आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यात हवामान विभागाकडून आज ऑरेंज अलर्ट दिला आहे.